ई-पास नावालाच, चोरवाटेने होतोय जिल्ह्यात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:58+5:302021-04-27T04:32:58+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यात परजिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश करता येऊ नये यासाठी सुमारे १६ ठिकाणी चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहेत. याठिकाणी कसून ...
उस्मानाबाद जिल्ह्यात परजिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश करता येऊ नये यासाठी सुमारे १६ ठिकाणी चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहेत. याठिकाणी कसून चौकशी सुरू असली तरी नागरिक चोरवाटेने जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बीड जिल्ह्यातून येणारे नागरिक रोखण्यासाठी जिल्ह्याची सीमा सोडून ५ किमी अंतरावर असलेल्या पारगाव टोलनाक्यावर चेकपोस्ट केला आहे. यादरम्यान, इतर असलेल्या रस्त्यावरून वाहनधारक पारगाव मार्गे जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. दुसरीकडे उमरगा येथून जवळच असलेल्या कर्नाटक बॉर्डरवर दोन्ही राज्यांचे पोलीस पहारा देत आहेत. मात्र, येथेही बीदर, बसवकल्याणला जाण्या-येण्यासाठी कासारिशरशी, हंद्राळ, हिप्परगा राव, तर आळंद, कलबुर्गीकडे जाण्या-येण्यासाठी डिग्गी, पळसगाव, तुगाव, गदलेगाव मार्गाचा वापर सुरू झाला आहे.
१५ सीमांवर पोलीस...
जिल्ह्यात परजिल्ह्यांतील नागरिकांना प्रवेश मिळू नये यासाठी १५ ठिकाणी चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहेत. येथे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पोलीस कर्मचारी पहारा देत आहेत. तामलवाडी, पारगाव टोलनाका, कसगी, कर्नाटक बॉर्डर चेकपोस्ट, शिवली, मुरुड-ढोकी, उस्मानाबाद-बार्शी यासह १५ ठिकाणी असे चेकपोस्ट आहेत.
कसगी बॉर्डर...
उमरगा तालुका हा महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील तालुका असून, कर्नाटकातील कलबुर्गी व बीदर जिल्ह्यांच्या सीमा तालुक्याला लागून आहेत. तालुक्यातील कसगी येथून कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेश करावा लागतो, तर तलमोड येथून बीदर जिल्ह्यात प्रवेश होतो. सध्या या दोन्ही सीमेवर उमरगा पोलिसांनी चेकपोस्ट केले असून, महाराष्ट्रात प्रवेश करताना ई-पास बंधनकारक असले तरी कोविड चाचणी प्रमाणपत्र दाखविल्यासही प्रवेश दिला जात आहे. कर्नाटकमधून उमरगा शहरात वैद्यकीय उपचारासाठी येणारी रुग्णसंख्या मोठी असल्याने काहीशी सवलत दिसते.
पारगाव टोलनाका...
वाशी तालुक्यातील पारगाव येथील जिल्हा सीमेवर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त पुरेसा नसल्याने जिल्ह्याबाहेरील वाहनांना जिल्ह्यात सहज प्रवेश मिळत आहे. जिल्ह्याची सीमा ही पारगावच्या उत्तरेकडे २ किमी अंतरावर आहे, तर पोलीस बंदोबस्त पारगावच्या दक्षिणेकडे ५ किमी अंतरावर पिंपळगाव (क) पाटीवरील टोलनाक्यावर आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याकडून येणाऱ्या वाहनांना उस्मानाबाद जिल्ह्यात सहज प्रवेश मिळत आहे. शिवाय, येथून जाणाऱ्या इतर मार्गांमुळे कळंब, वाशी, भूम, ईट, परंड्याकडे जाण्यास रस्ता मोकळा आहे.
तामलवाडी टोलनाका...
सोलापूर, पुणे रस्त्यांवरून जिल्ह्यात येण्यासाठी अनेक वाहने सोलापूर-धुळे महामार्गाचा वापर करतात. या महामार्गावर तामलवाडी नजीक जिल्हा हद्दीवर चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहे. याठिकाणी ४ कर्मचारी व ८ होमगार्डची ड्युटी लावण्यात आली आहे. सोमवारी केलेल्या पाहणीत येथून केवळ पास असणाऱ्या वाहनांनाच सोडण्यात आले. इतरांना तेथूनच परत पाठविण्यात येत होते. २४ तास असे चेकिंग सुरू असल्याचे येथील पोलिसांनी सांगितले.