कोरोना उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्याला मोफत ‘रेमडेसिविर’ मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:26 PM2020-07-20T17:26:29+5:302020-07-20T17:27:37+5:30
राजेश टोपे व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
उस्मानाबाद : कोरोना आजारावर तूर्त वापरात असलेली रेमडेसिविर ही औषधी प्रत्येक जिल्ह्यास मोफत पुरवली जाणार आहे. याबाबतची निविदाही पूर्ण झाली असून, ही औषधी लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उस्मानाबाद येथे रविवारी दिली.
राजेश टोपे व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यात त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले. जिल्ह्याच्या स्वाब तपासणी व टेस्टिंगचा आढावा घेऊन त्यावर नाराजी व्यक्त केली. मात्र, प्रयोगशाळेची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिका?्यांना तातडीने सोमवारीच रॅपिड टेस्ट किटची मागणी नोंदविण्याची सूचना त्यांनी केली. तसेच मृत्यू दरावरूनही ते काहीसे नाराज दिसले.
टेस्ट होण्यापूर्वीच मृत्यू होण्याच्या काही घटना लक्षात घेता त्यांनी चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या. तसेच, उस्मानाबाद येथील प्रयोगशाळा दोन दिवसात कार्यान्वित होईल, अशी माहितीही टोपे यांनी दिली. आवश्यकतेनुसार खाजगी हॉस्पिटल तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या. रुग्ण हाच केंद्रबिंदू मानून काम करण्यास टोपे यांनी सूचित केले.