'मुलींचा डबा खाल्ला, पाय चोपून घेतले'; पालकांशी हुज्जत घालणाऱ्या मुख्याध्यापिका अखेर निलंबित
By चेतनकुमार धनुरे | Published: June 19, 2023 07:54 PM2023-06-19T19:54:31+5:302023-06-19T19:55:04+5:30
लोहारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने आपली चौकशी पूर्ण करुन शिक्षण विभागाकडे अहवाल सादर केला.
धाराशिव : कडकनाथवाडी येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी आलेल्या पालकांशी उर्मट भाषेत बोलून असभ्य वर्तन केल्याचा ठपका तेथील मुख्याध्यापिकेवर चौकशी समितीने ठेवला आहे. या अहवालाच्या अनुषंगाने सोमवारी शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी संबंधित मुख्याध्यापिकेस निलंबित केले असून, तसे आदेशही त्यांनी जारी केले आहेत.
वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथील मुख्याध्यापिका ए.बी. मोराळे यांच्याबाबत पालकांनी तक्रार केली होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांना उर्मट भाषेत बोलणे, ग्रामस्थांनाही दमदाटी करुन हुज्जत घातल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत या घटनेची चौकशी लावण्यात आली होती. लोहारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने आपली चौकशी पूर्ण करुन शिक्षण विभागाकडे अहवाल सादर केला. या अहवालातून मुख्याध्यापिका मोराळे यांनी असभ्य वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हे वर्तन आरटीई ॲक्टमधील कलम २४ व कलम १७ चा भंग करणारे असल्याचे सांगत शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी मोराळे यांना निलंबित केल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यांच्या निलंबन काळात मुख्यालय हे उमरगा गटशिक्षणाधिकारी कार्यालय नेमून देण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही या आदेशात म्हटले आहे.
मुलींचा डबा खाल्ला, पाय चोपून घेतले...
मुख्याध्यापिका मोराळे यांनी शाळेतील मुलींचा डबा खाणे, पाय चोपून घेणे, खाण्यासाठी घरचे पदार्थ आणण्यासाठी विद्यार्थिनींवर दबाव टाकणे, असभ्य गाण्यांवर त्यांच्याकडून डान्स करुन घेणे, शाळेत कोणताच उपक्रम न घेणे, असे वर्तन केल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहेत.