नऊपैकी आठ बंधारे दरवाजाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:29 AM2021-04-26T04:29:13+5:302021-04-26T04:29:13+5:30

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर शेत शिवारातील मुख्य ओढ्यावर नऊ कोल्हापुरी बंधारे तर आठ सिमेंट बंधारे आहेत. ओढ्यावर ...

Eight out of nine dams without gates | नऊपैकी आठ बंधारे दरवाजाविना

नऊपैकी आठ बंधारे दरवाजाविना

googlenewsNext

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर शेत शिवारातील मुख्य ओढ्यावर नऊ कोल्हापुरी बंधारे तर आठ सिमेंट बंधारे आहेत. ओढ्यावर नाला सरळीकरण, खोलीकरण देखील झाले. परंतु, सद्य:स्थितीत नऊपैकी आठ कोल्हापुरी बंधारे दरवाजेविना असून, तर तीन-चार सिमेंट बंधाऱ्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सलग मागील दोन वर्ष चांगला पाऊस होऊनही पावसाचे पाणी आले तसे वाहून गेले. त्यामुळे आता ऊस कसा जगवायचा, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांसमोर आहे.

दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तसेच रोटरी क्लब व भारतीय जैन संघटना यांच्या मार्फत बलसूर येथील या ओढ्यावर नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पाणी थांबल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींना तसेच कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊन अडीचशे ते तीनशे हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतशिवारातील पाण्याचे स्त्रोत बारमाही सुरू राहणार आहे. परंतु, मागील तीन-चार वर्षात एखादाही दमदार पाऊस झाला नव्हता. पावसाळ्यात केवळ रिमझिम, पिकांना मुबलक असा पाऊस पडत गेल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली होती. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले होते. परिणामी शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय, पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागत होती. दरम्यान, सलग मागील दोन वर्ष परतीच्या झालेल्या दमदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली. तसेच पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न सुटला. यामुळे आपली शेती बारमाही ओलिताखाली राहील, या अपेक्षेने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. परंतु, बलसूर शिवारातील नऊपैकी आठ कोल्हापुरी बंधाऱ्यांना दारेच बसविण्यात आली नसून, यातील अनेक दारे गायबदेखील झाली आहेत. शिवाय, ओढ्यावर आठ सिमेंट बांधापैकी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन-चार सिमेंट बांधाच्या बाजूची माती वाहून गेली असल्याने सर्व पाणी वाहून गेले. परिणामी परिसरातील सिंचन विहिरी, कूपनलिका यांची पाणी पातळी घटली असून, मृगापर्यंत ऊस कसा जगवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दारे असती तर आज येथे पाणी थांबून परिसरातील २५० ते ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असता. परंतु, शासनाकडून पाणी अडवण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही केवळ दारे बसविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा पाऊस होऊनही ही पाणी न थांबता वाहून गेले. त्यामुळे बंधाऱ्यावर झालेला खर्च पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

कोट......

येथील कोल्हापुरी बंधाऱ्याला सात ते आठ वर्षांपासून दारे नाहीत. त्यामुळे पाणी थांबत नाही. शेतकऱ्यांकडून पाठपुरावा करूनही याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे हे बंधारे केवळ शोभेची वस्तू बनून राहिले आहेत.

- ज्ञानेश्वर नागराळे, शेतकरी, बलसूर

ओढा खोलीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी थांबल्यास परिसरातील सिंचन विहिरी, कूपनलिका यांचे पाणी कायम टिकून राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, अतिवृष्टीने सिमेंट बांध फुटले तर कोल्हापुरी बंधाऱ्यांना दारेच नसल्याने पाणी थांबले नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत परिसरातील पाणी पातळी खालावली आहे.

- गंगाराम चिवरे, शेतकरी, बलसूर

प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती व कोल्हापुरी बंधाऱ्याची दारे बसवावीत. तसे झाले तरच भविष्यात परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

- राम वाकडे, शेतकरी, बलसूर

Web Title: Eight out of nine dams without gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.