SSC Exam : दहावीच्या मराठीच्या पेपरला आठ विद्यार्थी रेस्टिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:29 PM2020-03-03T17:29:43+5:302020-03-03T17:30:02+5:30
SSC Exam : दहावीच्या परीक्षेसाठी २३ हजार २९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असता ४८६ विद्यार्थी गैरहजर
उस्मानाबाद : दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी मराठी विषयाच्या पेपरला चार केंद्रांवर मिळून आठ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडले. सदरील आठही जणांना रेस्टिकेट करण्यात आले.
दहावीच्या परीक्षेला मंगळवारी जिल्हाभरातील ८३ केंद्रावर सुरूवात झाली. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी प्रत्येक केंद्रावर एक या प्रमाणे ८३ बैठे पथके तैनात केली आहेत. तसेच विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकांचीही नजर आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी मराठी विषयाच्या पेपरला लोहारा हायस्कूल लोहारा येथे एका विद्यार्थ्यास कॉपी करताना पकडण्यात आले. यात जेवळी येथील बसवेश्वर हायस्कूल केंद्रावर चार, माकणी येथील सरस्वती विद्यालयात दोन तर पारा येथील जय भवानी विद्यालयातील केंद्रावर एका विद्यार्थ्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने केली. परीक्षेसाठी २३ हजार २९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असता ४८६ विद्यार्थी गैरहजर राहिले, अशी माहिती शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी ‘लोकमत’ला दिली.