उमरग्यातील ३७ गावांत ‘एक गाव एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:37 AM2021-09-12T04:37:44+5:302021-09-12T04:37:44+5:30
उमरगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनानुसार उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७३ पैकी ३७ गावांत ‘एक गाव एक गणपती’ ही ...
उमरगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनानुसार उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७३ पैकी ३७ गावांत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, नऊ गावांत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमरगा शहरात १६, तर उर्वरित २७ गावांत ४६ अशा एकूण ९६ सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने यंदा गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना नियम व अटी घातल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न केले गेले. त्याला उमरगा तालुक्यात चांगले यश मिळाले. तालुक्यातील धाकटेवाडी, हिप्परगाराव, कराळी, दूधनाळ, कदमापूर, हंद्राळ, कुन्हाळी, तलमोडतांडा, कदेर, गुंजोटीवाडी, डिग्गी, बेडगा, पळसगाव, पळसगावतांडा, नागराळ, एकोंडी, एकोंडीवाडी, औराद, गुगळगाववाडी, जकेकुरवाडी, कोळसूर (गुंजोटी), आष्टा जहागीर, पारसखेडा, दगडधानोरा, भिकारसांगवी, शाहूनगर, वागदरी, कोळेवाडी, बेटजवळगा, सावळसूर, नारंगवाडी, कवठा, मातोळा, गुरुवाडी या ३७ गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली असून, चिंचकोट, मळगीवाडी, मानेगोपाळ, दाबका, नारंगवाडी, बाबळसूर, बोरी, चिरेवाडी, भगतवाडी या नऊ गावांत गणपती बसविण्यात आलेला नाही. उर्वरित २७ गावांत ४६ गणेश मंडळे गणपती उत्सव साजरा करीत आहेत. उमरगा शहरातील ५४ पैकी १६ गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
चौकट..........
आवाहनास प्रतिसाद
गणेश मंडळांना कोरोनामुळे गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे, तसेच आगमनाची व विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे. गणेशोत्सव काळात डॉल्बी, बँड, ढोल ताशा, झांजपथक, लेझीम, आदी वाद्य वाजविण्यास बंदी, सजावट भापकेबाजी नसावी, सार्वजनिक मूर्ती चार फुटांपर्यंत असावी, धार्मिक पूजाविधी, आरती, भजन, कीर्तन यांना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळांनी विविध उपक्रम राबवावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करावी. मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी, सोशल डिस्टन्स असावा, घरगुती गणपतीचे विसर्जन घरीच करण्यावर भर द्यावा, लहान मुले व वृद्धांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला शहर, तालुक्यातील गणेश मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.