विनयभंग प्रकरणानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यात एकनाथ लाेमटे महाराजांस अटक
By बाबुराव चव्हाण | Published: August 25, 2023 08:29 PM2023-08-25T20:29:44+5:302023-08-25T20:30:07+5:30
फसवणूक प्रकरणात लोमटे महाराजास तीन दिवसांची काेठडी
धाराशिव/कळंब/येरमाळा : एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या मलकापूर (ता. कळंब) येथील एकनाथ महाराज लाेमटे यांच्यावर आणखी एक कायदेविषयक गंडांतर ओढवले आहे. विकास निधी आणण्यासाठी बनावट कागदपत्रे केल्याप्रकरणी येरमाळा ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातही महाराजांना येरमाळा पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील जिल्हा न्यायालयासमाेर हजर केले असता, २८ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली.
येरमाळा गावानजीक असलेल्या मलकापूर येथील एकनाथ महाराज लोमटे यांच्या दरबाराचे प्रस्थ अलिकडे संबंध राज्यभरात वाढलेले आहे. अशातच एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून लोमटे महाराजांवर येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. सध्या कळंब पोलीस तपास करत असलेल्या या प्रकरणात ते न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, शासनाचा विकास निधी मिळवण्यासाठी बनावट ठराव व नाहरकतपत्र सादर केल्याप्रकरणी मलकापूरच्या सरपंच रुक्मिन घोळवे व ग्रामसेवक दीपक वेदपाठक यांच्यावर चौकशी अधिकारी तुकाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट राेजी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
भादंवीचे कलम ४२०,४६५, ४६७ ४६८ व ४७१ अन्वये दाखल या गुन्हात सरपंचांना अटक झाली आहे. तर ग्रामसेवक फरार आहेत. दरम्यान, महिलेच्या विनयभंग प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले एकनाथ महाराज लोमटे यांना मलकापूर येथील विकास निधी आणण्यासाठी बनावट कागदपत्रे केल्याच्या आराेपावरून येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयासमाेर उभे केले असता, त्यांना २८ एप्रिलपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आली.