अल निनोमुळे जलसाठ्यांवर प्रभाव पडणार; धाराशिव जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार
By सूरज पाचपिंडे | Published: April 24, 2023 06:58 PM2023-04-24T18:58:13+5:302023-04-24T19:01:24+5:30
या वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागातील विविध संस्थांकडून वर्तविला जात आहे.
धाराशिव : अल निनोच्या प्रभावामुळे जलसाठे वेगाने खालावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याची धास्ती जिल्हा प्रशासनाने आतापासून घेतली असून, १ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून १४ कोटी ४५ लाखांचा विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
या वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागातील विविध संस्थांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे टंचाई निर्माण होण्याची स्थिती आहे. या संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी संस्था सरसावल्या आहेत. त्यानुसार जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडून ९ कोटी ५१ लाख ६६ हजारांचा कृती आराखडा तयार केला आहे, तर नगर विकास विभागाकडून शहरी भागाकरिता ५ कोटी ३ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यात ग्रामीण भागात टंचाई निवारणासाठी अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर दिला आहे, तर शहरी भागात पाणी पुरवठा योजना कामे, विंधन विहिरी, कूपनलिका घेणे, विंधन विहिरी दुरुस्ती, जनावराकरिता पाणवठे अशी कामे असणार आहेत.