वृद्ध, दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:43 AM2021-06-16T04:43:29+5:302021-06-16T04:43:29+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने कोरोना लसींचा शंभर टक्के वापर केला आहे. लस वाया जाऊ दिली नाही. याच पद्धतीने ...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने कोरोना लसींचा शंभर टक्के वापर केला आहे. लस वाया जाऊ दिली नाही. याच पद्धतीने यापुढेही वयोवृद्ध, व्याधीग्रस्त आणि दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य देतानाच इतरांनाही नियमाप्रमाणेच लस दिली जावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची बैठक झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी लसीकरण सत्रांची माहिती दिली.
ते म्हणाले, १ एप्रिल २०२१ पासून जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कोमॉर्बिड नागरिकांचा समावेश केला आहे. ज्या ठिकाणी उपकेंद्राची लोकसंख्या ५ हजार असेल व इतर सुविधा असतील, तेथेही लसीकरण सुरू आहे. सध्या ग्रामीण भागात ४४ ठिकाणी ग्रामस्तरावर लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. ६० वर्षापुढील ६० टक्के ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झालेले आहे, अशी माहितीही डॉ. वडगावे यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी शहरी भागातही वॉर्डनिहाय लसीकरण सत्रांचे नियोजन करून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने लसीकरण पूर्ण करून घेण्याचे सूचित केले. तसेच ऊसतोड कामगार, स्थलांतरित लोकसंख्या, फिरती लोकसंख्या आदी ठिकाणी लसीकरण सत्राचे आयोजन करून या घटकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही दिवेगावकर यांनी दिले.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, नोडल अधिकारी डॉ. इस्माईल मुल्ला, डॉ. शिवकुमार हलकुडे, युनिसेफचे डॉ. राजेश कुकडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर आदी उपस्थित होते.