केसला घाबरुन नव्हे, ‘सबका विकास’साठी भाजपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 02:43 PM2019-08-31T14:43:36+5:302019-08-31T14:47:16+5:30
गेल्या काही वर्षांपासून विकासाची प्रक्रियाच ठप्प झाली आहे़
उस्मानाबाद : राज्याभरासाठी बहुचचर्चित ठरलेले उस्मानाबादच्या पाटील कुटूंबियांच्या पक्षांतरावर शनिवारी अखेर शिक्कामोर्तब झाले़ राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ़राणा पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ही घोषणा जाहीर केली़ ती करताना हत्याकांडाच्या केसला घाबरुन नव्हे तर उस्मानाबादला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पाटील म्हणाले़
शरद पवारांसोबत चार दशकांहून अधिक काळ सावलीसारखे उभे राहणाऱ्या या कुटूंबाने ‘ते आदरणीय होते, आहेत व राहतील’ असे सांगत त्यांची साथ सोडली़ डॉ़पद्मसिंह पाटील व आ़ राणा पाटील यांनी शनिवारी उस्मानाबादेत निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधला़ यावेळी राष्ट्रवादीतील काही पदाधिकारीही त्यांच्यासमवेत मंचावर उपस्थित होते़ प्रारंभी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यानंतर आ़ राणा पाटील यांनी संवाद साधला़ ते म्हणाले, उस्मानाबादसाठी डॉ़पाटील यांनी काय केलं, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही़ मात्र, गेल्या काही वर्षांपासून विकासाची प्रक्रियाच ठप्प झाली आहे़ कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी अजून मिळाले नाही़ कौडगाव एमआयडीसीत उद्योग आले नाहीत़ दुसरीकडे शेजारच्याच लातूर, सोलापूर जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ झाली़ देश एकिकडे ‘सबका साथ, सबका विकास’च्या प्रवाहात असताना, उस्मानाबाद यात मागे राहू नये, म्हणून काळजावर दगड ठेवत हा पक्षांतराचा निर्णय घेत असल्याचे सांगून आ़पाटील यांनी भाजपात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली़ सध्या राजकारणात सक्रीय नसले तरी डॉ़पद्मसिंह पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते़ अखेरीस त्यांनी पुत्र राणा पाटील व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयास आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगितले़
आमच्या सत्ताकाळातही संघर्षच
राणा पाटील यांनी सत्तासंघर्षाची पदर उलगडून सांगताना आपण मंत्री राहिलो तरी तेव्हाही मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे सांगितले़ कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची योजना डॉ़पाटलांनी मंजूर करुन घेतली होती़ त्यास २० वर्षे उलटल्यानंतरही हे पाणी आपल्याकडे येऊ शकले नाही़ मी मंत्री राहिलो असलो तरी, संघर्षच करावा लागत होता, अशी शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागचे हेही एक अंतर्गत कारण स्पष्ट केले़