एसटी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरही हाल; म्हातारपणाची रक्कमही मिळता मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:33 AM2021-07-31T04:33:06+5:302021-07-31T04:33:06+5:30
उस्मानाबाद : सेवावृत्ती एस.टी. कर्मचाऱ्यांना कष्टाची जमापुंजी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शेकडो कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊन तीन वर्षे झाली ...
उस्मानाबाद : सेवावृत्ती एस.टी. कर्मचाऱ्यांना कष्टाची जमापुंजी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शेकडो कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊन तीन वर्षे झाली तरी पूर्ण रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर त्यांचे जगणेही मुश्कील झाले आहे.
ग्रामीण भागात एसटी महामंडळाचा मोठा आधार आहे. वाहतुकीसाठी प्रवाशांची पहिली पसंत ही एसटी बस असते. विभागात हजारो कर्मचारी महामंडळाच्या सेवेत रात्रंदिवस झटत आहेत. या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराचा व भत्त्यांचा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. नोकरीत असताना कर्मचाऱ्यांची विविध कारणांमुळे फरफट होते; परंतु, निवृत्तीनंतरही तेच हाल कायम असल्याचे दिसते. गत काही महिन्यांपासून निवृत्तीची रक्कम प्राप्त झाली नाही तर अनेकांची रजा रोखीकरण रक्कम मिळाली नाही. कमी पगारात रात्रीचा दिवस करून एसटीला जगविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला निवृत्तीनंतर खडतर आयुष्य आले आहे.
नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही फरफट
राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून २०१९ साली निवृत्त झालो आहे. रजेच्या रोखी कराराची पूर्ती महामंडळाने केलेली नाही. पेन्शनही तुटपुंजे मिळते. चार लाख ५० हजार रुपयांची रक्कम थकीत आहे.
दिलीप हतवळणे, निवृत्त कर्मचारी
निवृत्त होताना निर्वाह निधी व ग्रॅज्युइटीची रक्कम मिळाली आहे. परंतु, रजा रोखीकरण रक्कम मिळणे बाकी आहे. कामगार कराराचे आरएच राहिले आहेत. निवृत्त झाल्यानंतर जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत रक्कम मिळणे गरजचे आहे. दोन वर्ष झाले तरी सहा लाखांची रक्कम मिळालेली नाही.
अजित जाधव, निवृत्त कर्मचारी
सेवानिवृत्त झालेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांची देय असणारी विविध रक्कम काही महिन्यांपासून मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. बजेट नसल्याचे तकलादू कारणे सांगितली जात आहेत. रक्कम कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
विजयकुमार कांबळे,
विभागीय सचिव, कास्ट्राईब संघटना
जिल्ह्यातील एकूण आगार ६
अधिकारी २४
कर्मचारी ६६३
बसचालक १०९५
वाहक ९६४