मोबाईलच्या वाढत्या प्रस्थापुढेही लँडलाईनची ट्रिंग-ट्रिंग टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:36 AM2021-09-05T04:36:50+5:302021-09-05T04:36:50+5:30

जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असतील तर परस्पर संवादाची माध्यमे आहेत. मागच्या तीन दशकात याचा लँडलाईन ते वायरलेस ...

Even in the face of increasing mobile usage, landline trends continue | मोबाईलच्या वाढत्या प्रस्थापुढेही लँडलाईनची ट्रिंग-ट्रिंग टिकून

मोबाईलच्या वाढत्या प्रस्थापुढेही लँडलाईनची ट्रिंग-ट्रिंग टिकून

googlenewsNext

जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असतील तर परस्पर संवादाची माध्यमे आहेत. मागच्या तीन दशकात याचा लँडलाईन ते वायरलेस मोबाईल असा झालेला प्रवास जितका ‘स्मार्ट’, तितकाच ‘फास्ट’ अनुभवता आला. संवाद माध्यमातील निरोपाची तार ते परस्परांना कनेक्ट करणारे फोन, एसटीडी पीसीओ ते कॉईनबॉक्स असा झालेला साधनांचा प्रवास हायटेक अशा मोबाईलच्या स्वरूपात प्रत्येक गावच्या वेशी ओलांडत गावशिवारात दाखल झाला आहे. मग, काळाच्या ओघात जुन्या ट्रिंग ट्रिंग अशा खणखणाऱ्या लँडलाईन, कॉईनबॉक्सची काय स्थिती असेल? याचा धांडोळा घेतला असता आजही काही ठिकाणी लँडलाईन अस्तित्व टिकवून असल्याचे तर कॉईनबॉक्स मात्र दुर्मीळ झाल्याचे दिसून आले.

केवळ पावणेसहाशे लँडलाईन...

कळंब तालुक्यात वीस वर्षापूर्वी दोन हजारावर लँडलाईन फोन होते. घरात फोन असणे हा ‘स्टेटस सिम्बॉल’ होता. यानंतर मोबाईलचे प्रस्थ वाढले. यात लँडलाईन कमी कमी होत गेले. आजच्या स्थितीत तालुक्यात केवळ ५७५ लँडलाईन आहेत. यातील ३२५ ब्रॉडबँड आहेत.

कॉईनबॉक्स दुर्मिळ, मोबाईलचा सुकाळ...

थेट कनेक्टिव्हिटीमध्ये बीएसएनएलचा वरचष्मा होता. यांचे १३ एक्सचेंज ऑफिसशी शंभरावर कॉईनबॉक्स व २६ पीसीओ कनेक्ट होते. आजच्या स्थितीत या दोन्ही बाबी निरंक आहेत. कॉईनबॉक्स दुर्मिळ झाले आहेत. मोबाईलधारक मात्र चार हजारावर असून २५ बीटीएस त्यांना सेवा देत आहेत.

कोण वापरत आहे लँडलाईन...

सध्या अस्तित्वातील ५७६ पैकी ३२५ लँडलाईन ग्राहक ब्रॉडबँड वापरत आहेत. यात शासकीय कार्यालय, बँकांचा समावेश आहे. याशिवाय ३९ कार्यालय, वित्तीय संस्था थेट लीज कनेक्शनने तर ४१ ग्रामपंचायत बीबीएनएलशी कनेक्ट आहेत. नवीन ओव्हर हेड केबल कनेक्शनही उपलब्ध झाले आहेत, असे दूरसंचार अधिकारी के. एन. ठाकूर यांनी सांगितले.

कोट...

आमच्या ग्रामीण रुग्णालयात लँडलाईन कनेक्शन कार्यान्वित आहे. याचा क्रमांक संबंध तालुकाभरात ज्ञात आहे. यामुळे एखाद्या गंभीर स्थितीत, मदतीची गरज असताना व रुग्णांची माहिती घेण्याकरिता याचा आजही वापर केला जातो.

- डॉ. जीवन वायदंडे, वैद्यकीय अधीक्षक

आमच्या बँकेत लँडलाईन आहे. याचा संवादासह बँकेतील संगणकीय कामकाजासाठी वापर केला जातो. लँडलाईन हा स्थायी स्वरूपाचा असल्याने ऑफिशियल संवाद हा लँडलाईनच्या माध्यमातूनच होतो.

-प्रदीप शिंदे, मुख़्य व्यवस्थापक प्रियदर्शिनी बँक

Web Title: Even in the face of increasing mobile usage, landline trends continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.