लॉकडाऊनमध्येही दे दारु, देशी-विदेशीने गाठला एव्हरेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:12+5:302021-05-22T04:30:12+5:30
मागील आर्थिक वर्षात अनेक दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद होती. उघडल्यानंतरही बराच काळ होम डिलिव्हरीचे निर्बंध राहिले. तेही सकाळी ७ ...
मागील आर्थिक वर्षात अनेक दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद होती. उघडल्यानंतरही बराच काळ होम डिलिव्हरीचे निर्बंध राहिले. तेही सकाळी ७ ते ११ या वेळेत. आता इतक्या सकाळी-सकाळी कोण बैठक लावणार का, तेही घर? अशी अनेक आव्हाने समोर उभी असतानाही पिणार्यांचे किंवा देणार्यांचेही पाय थोडेसेही डगमगले नाहीत. उलट अधिक हिंमतीने पाय रोवून पिणारे पीत गेले, देणारे देत गेले. यातूनच २०१९-२० या आर्थिक वर्षात देशी व विदेशी दारुची जितकी विक्री झाली होती, त्यापेक्षाही जास्त कोरोना काळात झाली आहे. फटका केवळ बिअर विक्रीला बसला आहे. विक्रीच्या आकडेवारीवर नजर फिरविल्यास डोळे पांढरे पडायची वेळ सामान्यांवर येईल, अशी स्थिती आहे.
बिअरविक्री घटली, देशी-विदेशी वाढली...
१. जिल्ह्यात यंदा बिअरविक्री घटली आहे. २०१९-२० मध्ये २४ लाख ६१ हजार २२४ लिटर्स बिअरची विक्री झाली होती. २०२०-२१ या वर्षात ही विक्री १८ लाख ९७ हजार २८७ वर पोहोचली.
२. देशी दारुचा खप यंदा जास्त झाला आहे. २०१९-२० मध्ये ३४ लाख ६ हजार ३६९ लिटर्स देशी दारुची विक्री झाली होती. २०२०-२१ या वर्षात ही विक्री वाढून ३६ लाख ५३ हजार ८ लिटर्सवर गेली.
३. विदेशी दारुचाही खप वाढला आहे. २०१९-२० मध्ये २० लाख २३ हजार ४३३ लिटर्स देशी दारुची विक्री झाली होती. २०२०-२१ या वर्षात ही विक्री वाढून २१ लाख ९४ हजार ७४४ लिटर्स इतकी झाली.
दीड कोटींची दारु जप्त...
लॉकडाऊनच्या काळात छुप्या पद्धतीने अवैध दारु विक्रीला ऊत आला होता. त्यामुळे यावर्षी कारवायाही वाढल्या आहेत. गतवर्षीच्या ९२२ कारवाया उत्पादन शुल्क विभागाने केल्या होत्या. त्यात वाढ होऊन २०२०-२१ मध्ये ९७० कारवाया झाल्या. गतवर्षी एकूण ९९ लाख १७ हजार २१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यावर्षी १ कोटी ४९ लाख ७२ हजार ८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाईन विक्री चांगलीच वाढली...
वाईन पिणारे क्वचितच आढळून येतात. त्यामुळे वाईनला फारशी जिल्ह्यात मागणीही नाही अन् विक्रीही. तरीही २०१९-२० मध्ये २३ हजार २६६ लिटर्स वाईनची विक्री झालेली होती. मात्र, लॉकडाऊन काळात अनेकजण घरी बसून राहिल्याने काहींनी पिणे तर काहींनी नव्यानेच यापासून पिण्यास सुरुवात केल्याचे दिसते. यावर्षी सुमारे १३ हजार लिटर्सने वाढ होऊन विक्रीचा आकडा हा ३६ हजार ५८१ वर गेला आहे.
महसूलला दारुने दिला आधार...
एकिकडे अत्यावश्यक सेवेतील वगळता अन्य आस्थापना बहुतांश काळ बंद राहिल्याने महसुलावर विपरीत परिणाम झाला होता. मात्र, याच काळात मद्यविक्री जोरात झाल्याने या माध्यमातून मिळणार्या महसुलात वाढ झालेली आहे. इतर क्षेत्रातील महसुलाचा वाटा कमी झाला तरी मद्यप्रेमींनी आपला वाटा मात्र नेहमीप्रमाणेच पुरेसा भरला असल्याचे दिसून येते.
७८ लाख लिटर्स मद्य रिचविले
२०१९-२० : ७९,१४,२९२
२०२०-२१ : ७७,८१,६२०