मुदत संपली तरी बहुला येथील बंधाऱ्याच्या कामाला मुहूर्त मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:24 AM2021-06-01T04:24:35+5:302021-06-01T04:24:35+5:30
कळंब : एकीकडे भाळी दुष्काळी शिक्का असलेल्या भागात एकतर निधी मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव असताना दुसरीकडे तालुक्यातील बहुला येथे ...
कळंब : एकीकडे भाळी दुष्काळी शिक्का असलेल्या भागात एकतर निधी मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव असताना दुसरीकडे तालुक्यातील बहुला येथे मुदत संपली तरी तीन सिमेंट बंधाऱ्याच्या कामांना अद्यापही मुहूर्त लागला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बीड व उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा बनत प्रवाही होणाऱ्या मांजरा नदीच्या तीरावर तालुक्यातील बहुला गाव वसलेले आहे. या गावच्या शिवारात मांजरा नदीच्या पात्रात फेजरयुक्त दारासह चेक डॅम बांधकाम करण्यासाठी औरंगाबाद येथील मृद व जलसंधारण महामंडळाला जवळपास ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया मार्च २०१९ मध्ये पूर्ण झाली होती. राज्यात सर्वत्र ‘बिलो’ दराने ठेका जात असताना बहुला येथील या कामाचा ठेका मात्र मुंबई येथील एका एजन्सीला तब्बल साडेतीन टक्के चढ्या दराने मंजूर झाला होता. यानंतर जिल्हा मृद संधारण अधिकाऱ्यांनी सदर एजन्सीला मार्च २०१९ मध्ये कार्यारंभ आदेश निर्गमित करून २४ महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, सदर कामाची दोन वर्षांची मुदत संपत आली तरी संबंधित विभाग व त्या एजन्सीने केवळ नदीपात्राच्या खोलीकरणाचा प्रयत्न करून काम थांबविले आहे. यातही सदर खोलीकरणात खोलीचा अभाव असल्याची ग्रामपंचायतीची तक्रार आहे. एकूणच दोन वर्षांची मुदत संपली तरी तीनपैकी एकाही सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण होणे तर दूरच, साधे हातीही घेण्यात न आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
चौकट... ©
मंत्र्यांनी लक्ष द्यावे
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्हा मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत बहुला येथील कामे येत आहेत. दुष्काळी भागात मोठ्या योजनांना वाव नाही. शिवाय, लघु योजनांना एकतर निधी मिळत नाही. यातच निधी मिळालेल्या गावांत अशी कामे पूर्ण होणे तर दूरच; परंतु मुदत संपली तरी सुरूच होत नसतील तर फारच गंभीर बाब आहे. याची पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत.
पाणी वाहून जाण्यापूर्वी पडताळणी करा
दरम्यान, बहुला ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी यासंदर्भात नुकतीच सदर खोलीकरण झालेल्या कामाची पावसाळ्यापूर्वी त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. अंदाजपत्रकात एका कामात एक कि.मी. लांबीमध्ये ४५ मीटर रुंद व दीड मीटर खोल खोदकाम अपेक्षित असल्याचे समजते. यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून गेल्यास काम केले की नाही, याची खातरजमा होणार नसल्याचे यात नमूद केले आहे.
चढ्या दराने ठेका तरी
बहुला येथे मांजरा नदीवर फेजरयुक्त दारासह चेक डॅम बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ९१ लक्ष रुपयांना मान्यता मिळाली होती. यात जीएसटी, रॉयल्टी यांचे १ कोटी ७५ लाख वजा जाता कामावरील खर्च ३ कोटी १५ लाख अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या कामाचा ३.५० टक्के जादा दराने ठेका मंजूर झाला असल्याने ३ कोटी १५ लाखांऐवजी कामाचा खर्च ३ कोटी २७ लक्ष होणार आहे. एकूणच चढ्या दराने ठेका मंजूर असतानाही मुदत संपली तरी एकही चेक डॅम पूर्ण झालेले नाही.