संविधान जाळल्याच्या घटनेवर 'व्हॉट्सअॅप' वर चॅटींग करणे पडले महागात; चार तरुणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 06:44 PM2018-08-13T18:44:20+5:302018-08-13T18:56:52+5:30
दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या विषयावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे अन् त्याला अंगठा दाखूवन सहमती दर्शविणे चार तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
उमरगा (उस्मानाबाद) : दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या विषयावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे अन् त्याला अंगठा दाखूवन सहमती दर्शविणे चार तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील त्रिकोळी येथील या चार तरुणांवर आज उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील काही तरुणांनी त्रिकोळीकर नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे़ या ग्रुपवर संपत बिराजदार याने रविवारी सकाळी संविधान जाळण्यात आल्याच्या विषयावर आक्षेपार्ह टिप्पणी केली़ त्यास केदार बाळू जाधव, किसन माधव कुन्हाळे यांनी अंगठा दाखवत सहमती दर्शविली़ तर धीरज हासुरे यानेही बिराजदार याच्या पोस्टचे समर्थन करीत टाळी वाजविल्याचे चिन्ह पोस्ट केले.
ही चॅटिंग निदर्शनास आल्यानंतर त्रिकोळी येथीलच शशिकांत नागनाथ सुरवसे या तरुणाने रविवारी रात्री उमरगा ठाणे गाठून चारही जणांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकाराची शहानिशा करुन पोलिस निरीक्षक माधव गुंडिले यांच्या सूचनेनुसार प्रिव्हेन्शन आॅफ इन्सल्ट टू नॅशनल आॅनर अॅक्ट १९७१ नुसार भादंविच्या कलम ५०५ (२), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संपत बिराजदार व केदार जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
राष्ट्राभिमानाच्या प्रतिकांचा अवमाऩ़़
‘प्रिव्हेन्शन आॅफ इन्सल्ट टू नॅशनल आॅनर अॅक्ट १९७१’ या कायद्यात राष्ट्राभिमानाच्या प्रतिकांचा अवमान करण्याबद्दलच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे़ राष्ट्रध्वज व संविधान ही राष्ट्राभिमानाची प्रतिके आहेत़ याशिवाय, राष्ट्रगीत गातानाही कोणी अडथळा आणत असेल वा रोखत असेल तर त्यालाही शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद कायद्यात आहे़ या तरतुदीनुसार आरोपीस तीन वर्षांपर्यंत कैद किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा करता येऊ शकतात़ असाच गुन्हा संबंधित आरोपींनी दुसऱ्यांदा केल्यास कैदेची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे, जी एक वर्षापेक्षा कमी नसेल.