अखेर रखडलेली ऊसतोड झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:50+5:302020-12-25T04:25:50+5:30
खेडमधील शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लोहारा : तालुक्यातील खेड येथे शेतरस्त्याअभावी शेकडो एकरातील ऊसतोड थांबली होती. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त ...
खेडमधील शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी
लोहारा : तालुक्यातील खेड येथे शेतरस्त्याअभावी शेकडो एकरातील ऊसतोड थांबली होती. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध करताच याची दखल घेत प्रशासनाने बुधवारी रात्री प्रत्यक्ष तेथे जाऊन पोलीस बंदोबस्तात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे गुरुवारपासून या भागातील रखडलेली ऊसतोड पुन्हा सुरू झाली. खेड येथील प्रमुख जिल्हा मार्ग ४३ ते जुने गावठाण खेड रस्ता गावातील काही लोकांनी उखडून नुकसान केले होते. या रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचा वमान करीत रस्ता उखडल्याने संबंधितांवर कारवाईसाठी खेड येथील पन्नासवर शेतकरी १९ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते. यानंतर खेड येथील आठ जणांविरुध्द शासकीय मालमत्तेचे नुकसान केले म्हणून गुन्हाही दाखल झाला होता.
दरम्यान, या रस्त्याची दुरुस्ती रखडल्यामुळे रस्त्यापलीकडे असलेल्या ४० ते ५० शेतकऱ्यांचा २०० ते २५० एकरांवरील ऊसतोड खडली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारी ‘शेतरस्त्याअभावी शेकडो एकरांतील ऊसतोड थांबली’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करताच प्रशासनाने बुधवारी रात्री पोलीस बंदोबस्तात रस्ता दुरुस्त केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता संजय विभूते, शाखा अभियंता डी. जी. डोईजोडे, मंडळ अधिकारी साळुंके, तलाठी वाजिद मनियार, पोकॉ अनिल बोधनवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी,शेतकरी उपस्थित होते.