अखेर स्थानक परिसर झाला खड्डेमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:21+5:302021-03-26T04:32:21+5:30
(फोटो : रणजीत मोरे २४) काक्रंबा : येथील बस स्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघात वाढले होते. याबाबत ‘लोकमत’ने ...
(फोटो : रणजीत मोरे २४)
काक्रंबा : येथील बस स्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघात वाढले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत संबंधित ठेकेदारास खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी डांबर टाकून हा परिसर खड्डेमुक्त करण्यात आला.
काक्रंबा येथून रत्नागिरी तुळजापूर नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रिटमध्ये बांधण्यात आला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून काक्रंबा येथील उड्डाणपूल मात्र अर्धवट अवस्थेत सोडल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वारंवार अपघात घडत होते. यामध्ये बऱ्याच जणांचे जीव गेले तर अनेकजण जखमी झाले. त्यामुळे वाहनधारकांसह, प्रवासी, पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही दिवसांपूर्वीच ५५ वर्षीय जिलानी मुलानी हे रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून किमान खड्डे तर बुजवून घेण्याची मागणी लावून धरली होती.
दरम्यान, प्रशासनाने खड्डे बुजवून नागरिकांची गैरसोय दूर केली आहे. परंतु, रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम कधी मार्गी लागणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे हे कामही त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.