परीक्षा ढकलली; विद्यार्थी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:57 AM2021-03-13T04:57:02+5:302021-03-13T04:57:02+5:30

उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील वर्षभरापासून महाराष्ट्र राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली जात आहे. मागील काही महिन्यात रुग्णसंख्या ...

Exam pushed; Students angry | परीक्षा ढकलली; विद्यार्थी संतप्त

परीक्षा ढकलली; विद्यार्थी संतप्त

googlenewsNext

उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील वर्षभरापासून महाराष्ट्र राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली जात आहे. मागील काही महिन्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने १४ मार्च रोजी परीक्षा जाहीर केली होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने परीक्षा पुढे ढकली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला असून, या निर्णयाविरुद्ध विद्यार्थ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून, ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याची तयारी करीत असतात. मागील आठ ते दहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. वर्षानुवर्ष अभ्यास करीत आहेत. दरवर्षी होणाऱ्या राज्यसेवेची परीक्षा देण्याचा कलही तरुणांचा वाढू लागला आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे शासनाने २३ मार्चपासून लाॅकडाऊन लागू केला. या काळात शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा पुढे ढकलली तरी ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला होता. दिवाळीनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून परीक्षा घेण्याची मागणी होऊ लागली. ही बाब लक्षात घेऊन शासनाने १४ मार्च रोजी एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली होती. परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले होते. परीक्षेचे हाॅल तिकीटही विद्यार्थ्यांच्या हाती पडले होते. मात्र, परीक्षा तीन दिवसांवर आली असतानाच अचानक शासनाने परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय घेतला. शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी संतप्त झाले असून, शासनाच्या निर्णयाचा विरोध होऊ लागला आहे. शासनाने कोरोनाचे नियम बंधनकारक करून परीक्षा १४ मार्च रोजीच घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होऊ लागली आहे.

एमपीएससीची पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी निश्चित झाली होती. परीक्षेचे हाॅल तिकीटही आले. हाॅल तिकीट हाती पडल्यानंतर शासनाने अचानक परीक्षा पुढे ढकलली आहे. शासनाचा हा निर्णय चुकीचा आहे.

-अंजली नरसुरे, परीक्षार्थी, उमरगा

मी मागील चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. दिवसेंदिवस परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी अभ्यासात मग्न होते. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

- अंजली नरसुरे, परीक्षार्थी, उमरगा

काेरोनाचा फटका विद्यार्थ्यांना मागील वर्षभरापासून बसत आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुज्ञ असतात. फिजिकल डिस्टन्स, मास्क बंधनकारक करून शासनाने १४ मार्च रोजी परीक्षा घ्यावी.

-अक्षय पाचपिंडे, परीक्षार्थी, उस्मानाबाद

परीक्षा रद्द होण्याची चाैथी वेळ

कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून परीक्षा पुढे ढकलली जात आहे. गतवर्षी एप्रिल, सप्टेंबर, डिसेंबर या महिन्यात एमपीएससीची परीक्षा पुढे ढकण्यात आली होती. त्यानंतर १४ मार्च तारीख जाहीर केली होती. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चाैथ्या वेळेस परीक्षा पुढे ढकल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

परीक्षेसाठी हॉल तिकीट दिले गेले होते

मागील वर्षभरात तीन वेळा परीक्षा पुढे ढकलल्यानंतर शासनाने १४ मार्च रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली होती. परीक्षेचे हॉल तिकीट परीक्षार्थींच्या हाती पडले होते. प्रशासनाकडून परीक्षा केंद्र केले होते. मात्र अचानक परीक्षा पुढे ढकल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नाही?

मागील महिन्यात आरोग्य विभागाची परीक्षा पार पडली. बीएसएफ परीक्षाही झाली आहे. मग एमपीएससीची परीक्षा का होत नाही, असा प्रश्न एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Web Title: Exam pushed; Students angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.