गुप्तधनासाठी खोदला पुरातन कलावंतिणीचा महाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:36 AM2019-08-23T11:36:25+5:302019-08-23T11:43:17+5:30
खड्डे अन् रांजणाचे अवशेष आढळले
ईट (जि. उस्मानाबाद): भूम तालुक्यातील उमाचीवाडी शिवारातील कलावंतिणीचा महाल म्हणून परिचित असलेल्या एका पुरातन वास्तूत खोदकाम झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे़ येथील खड्ड्यांशेजारी लिंबू, नारळ व पूजा केल्याचे दिसून येत असल्याने हा प्रकार गुप्तधनासाठी घडल्याचा संशय व्यक्त होत आहे़
उमाचीवाडी शिवारातील एका छोट्या टेकडीवर कलावंतिणीचा महाल आहे. या महालाच्या मधोमध दोन ठिकाणी खोदकाम झाल्याचे गुरुवारी काही नागरिकांच्या निदर्शनास आले़ या दोन्ही खड्ड्यांच्या जवळ नारळ, लिंबू, पाण्याच्या बाटल्या, हळदी-कुंकू, असे साहित्य आढळून आले़ याच ठिकाणी पूजा बांधलेलीही दिसून येत आहे़ शोजारीच दोन फुटलेल्या रांजणाचे अवशेष आढळून आल्याने नागरिकांनी ही घटना तातडीने भूम पोलिसांना कळविली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकाराचा पंचनामा केला आहे़ मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
वास्तूत दिसून येतात रांजणाचे अवशेष
या महालात पूर्वीची काळी एक महिला कलावंत वास्तव्यास होती़ यावरुनच या वास्तूला कलावंतिणीचा महाल असे नाव पडले़ या महालाखाली सात रांजण भरुन सोने पुरून ठेवण्यात आले आहे़ मात्र, महालाच्या परिसरात कलावंतिणीचा आत्मा भटकत असतो़ त्यामुळे हे गुप्तधन काढण्याचे धाडस कोणी करीत नाही, अशी रंजक कथा या भागात सांगितली जाते. या भागात सांगितल्या जाणाऱ्या कथेनुसार महालात रांजणाचे अवशेष दिसून येतात़ अज्ञातांनी खोदलेल्या खेड्ड्यांशेजारी दोन फुटलेल्या रांजणाचे अवशेष पडले आहेत़ याशिवाय, आणखीही दोन रांजण नजरेस पडलीत अशा स्थिती जमिनीच्या समपातळीवर दिसून येतात़ मात्र, खरेच यात गुप्तधन आहे का? याविषयी ठोस कोणीही सांगू शकत नाही.