उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:32 AM2020-06-11T11:32:14+5:302020-06-11T11:33:15+5:30
पहिल्याच पावसात मांजरा नदीपात्र वाहते झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
उस्मानाबाद - जिल्हयात बुधवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. ५ मंडळात अतिवृष्टी नोंदविली गेली. सर्वाधिक ९९ मिलिमीटर पाऊस भूम तालुक्यातील ईट मंडळात झाला आहे. पहिल्याच पावसात मांजरा नदीपात्र वाहते झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
बुधवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा निर्माण झाला असतानाच सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उमरगा तालुक्यातील येनेगूरसह काही भागात पावसाला सुरवात झाली. साधारणपणे सायंकाळी साडेसहा वाजता तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यामुळे वाशी तालुक्यतील इंदापूर येथील शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवारातील असंख्य झाडेही उन्मळून पडली आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्हयात सर्वाधिक ९९ मिमी पावसाची नोंद भूम तालुक्यातही ईट सर्कलमध्ये झाली आहे. भूम सर्कलमध्येही तब्बल ७१ मिमी पाऊस कोसळला.
यासोबतच उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, पाडोळी मंडळात प्रत्येकी ६२ मिमी तर जगजीत ६३ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, चार मांडळे अशी आहेत, जी अतिवृष्टीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. यात तुळजापूर तालुक्यतील सावरगाव मंडळात ६१ मिमी, गिविंदपूर ५९ मिमी, वाशी ५७ मिमी आणि परगावमध्ये ५३ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.