अपेक्षा होती ८०० कोटींच्या विम्याची मिळाले ४०७ कोटी; आढेवेढे घेत विमा कंपनी झाली अखेर तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 11:40 PM2021-12-08T23:40:41+5:302021-12-08T23:41:12+5:30
विमा कंपनीने नुकसान मान्य करून प्रति हेक्टरी १३ हजार ते १६ हजार ५०० रुपयेपर्यंत भरपाई देण्यास सुरुवात केली आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टी व पावसाचा खंड, अशा विचित्र निसर्गयोगाने यावेळी शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यात विमा कंपनीने प्रचंड आढेवेढे घेत अखेरीस ४०७ कोटी रुपये भरपाई देण्याचे निश्चित करून त्याचे वितरण सुरू केले आहे. प्रत्यक्षात ही भरपाई ८०० कोटींच्या घरात असणे अपेक्षित असल्याचा दावा लोकप्रतिनिधींनीनी केलेला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यंदा विचित्र निसर्गयोगाचा अनुभव घेतला. आधी पावसाचा दीर्घ खंड व नंतर अतिवृष्टी. या दोन्ही प्रतिकूल स्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, विमा कंपनी हे नुकसान मान्य करण्यास तयार नव्हती. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या रेट्यामुळे कंपनी अखेर तयार झाली. विमा कंपनीने नुकसान मान्य करून प्रति हेक्टरी १३ हजार ते १६ हजार ५०० रुपयेपर्यंत भरपाई देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात ही भरपाई जवळपास ८०० कोटींच्या घरात मिळणे अपेक्षित आहे.
दरम्यान, कंपनीने ३ लाख ४२ हजार४२२ शेतकऱ्यांना पत्र ठरवून त्यांना ४०६.९९ कोटी रुपये विमा मंजूर केला आहे. त्याचे वितरणही सुरू असून, २४९.३५ कोटी रुपये बँकांकडे वर्ग केल्याचे विमा कंपनीने कळविले आहे.
सेना खासदार, आमदारांचा आक्षेप...
सेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी या भरपाईवर आक्षेप घेतला आहे. समाजमाध्यमात त्यांनी रात्री उशिरा केलेल्या पोस्टनुसार भरपाई निम्मीच मिळाल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी केंद्र शासनाच्या एका नोटिफिकेशनला जबाबदार धरले असून, खासदारांनी याबाबत संसदेत तर आमदारांनी न्यायालयीन लढा लढण्याचे संकेत दिले आहेत.