आगामी निवडणुकांत जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:18+5:302021-07-28T04:34:18+5:30
कळंब : आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे. परवा कळंब येथे ...
कळंब : आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे. परवा कळंब येथे न.प.ने घेतलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी व सेनेच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाने केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात या चर्चेने जोर धरला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी नव्हते. मात्र राष्ट्रवादी व शिवसेनेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातही महाविकास आघाडी करण्याचे संकेत दिले. तसेच जिल्ह्यात भाजप हाच प्रमुख व एकमेव विरोधक असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी तर राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जिल्ह्यात अमलात आणला तर कोणी विरोधकच राहणार नाही, असा दावा केला. खा ओमराजे निंबाळकर यांनीही त्यांचे पारंपरिक विरोधक आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता टीका करून राष्ट्रवादी आता स्वतंत्र झाल्याचे सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राष्ट्रवादी व सेनेने न.प.मध्ये सहकार्याने काम करण्याचा सल्ला दिला. तर सेनेचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांनी सेना-राष्ट्रवादीमधील मागील स्थानिक वाद विसरून विकासासाठी काम करण्याचा सल्ला दिला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांतील निर्णय प्रक्रियेत असणाऱ्या नेतृत्वाने अशी एकजुटीची भावना व्यक्त केली. यामुळे किमान कळंब व उस्मानाबादच्या निवडणुकांच्या मर्यादेतही हा प्रयोग होऊ शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
चौकट -
भाजपच टार्गेट
राष्ट्रवादी-सेनेचे जिल्ह्यातील राजकीय विरोधक भाजपच असल्याचे स्पष्ट आहे. भाजपनेही आता बूथबांधणीकडे भर दिला आहे. गावोगावी शाखा स्थापनेच्या हालचाली चालू केल्याने भाजपने निवडणुकांची तयारी केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपविरुद्ध सर्व अशी लढाई दिसू शकते, असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.