तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फाेट; आठ मजूर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:09 IST2025-01-30T15:08:41+5:302025-01-30T15:09:10+5:30
अचानक झालेल्या या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या पाच महिला व तीन पुरुष असे आठ मजूर जखमी

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फाेट; आठ मजूर जखमी
वाशी (जि. धाराशिव) : तालुक्यातील तेरखेडा येथील फटाका कारखान्यात २९ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फाेट झाला. या घटनेत पाच महिला व तीन पुरुष असे आठ कामगार जखमी झाले. यांपैकी पाच गंभीर जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे रेफर करण्यात आले; तर उर्वरित तिघा जखमींवर धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तेरखेडा शिवारातील शेती गट नं. १२८१ मध्ये छोटूमियाँ दारूवाले यांच्या मालकीचा बाबा फायर वर्क्स हा फटाके निर्मितीचा कारखाना आहे. बुधवारी दुपारी साधारणपणे अडीच वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या पत्र्याच्या गोदामामध्ये अचानक स्फोट झाला. कारखानदार मात्र शेतीचा बांध पेटत आल्यामुळे स्फोट झाल्याचे सांगत आहेत. दरम्यान, अचानक झालेल्या या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या पाच महिला व तीन पुरुष असे आठ मजूर जखमी झाले आहेत. यांपैकी अनिल तोरडमल, चंद्रकांत घाटुळे, साखरबाई गांधले, शोभा करडे, मंजुषा ओव्हाळ या गंभीर जखमींवर धाराशिव येथे प्रथमाेपचार करून साेलापूर येथे रेफर केले; तर अभिजित गायसमुद्रे, सोनाली गायसमुद्रे व शारदा ओव्हाळ यांच्यावर धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमी कडकनाथवाडी येथील रहिवासी आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रकाश म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पाॅटवर धाव घेत पंचनामा केला. तसेच या संबंधीचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे.
कारखान्यांची झडती घेणार
तेरखेडा येथे झालेल्या स्फोटाची पाहणी केली आहे. सततच्या घटना लक्षात घेता, तालुक्यातील फटाका कारखान्यांची तपासणीची माेहीम हाती घेण्यात येणर आहे. कारखाना चालकांकडे नियमानुसार परवाना आहे की नाही?, कारखान्याची जागा अकृषी केलेली आहे की नाही?, आदी बाबींची पडताळणी केली जाईल, असे वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.