मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; तरूणाने संपवले जीवन
By बाबुराव चव्हाण | Published: January 19, 2024 06:56 PM2024-01-19T18:56:18+5:302024-01-19T18:56:40+5:30
अवघ्या २३ वर्षीय तरूणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.
वाशी (जि. धाराशिव) -मराठा आरक्षणासाठी एका २३ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १९ जानेवारी राेजी वाशी तालुक्यातील बावी येथे घडली. आत्महत्येपूर्वी या तरूणाने खिशात चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
मराठा आरक्षणासाठी काेणीही जीव देऊ नये, असे आवाहन आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्याकडून वेळाेवेळी केले जात आहे. असे असतानाही आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. १९ जानेवारी राेजी वाशी तालुक्यातील बावी येथील राजकुमार लहू शिंदे या अवघ्या २३ वर्षीय तरूणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून खिशात ठेवली हाेती. ‘‘मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकार आरक्षण देण्यासाठी चालढकल करीत आहे’’, असं त्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शाेककळा पसरली आहे.