उस्मानाबाद जिल्ह्यातील ७ सर्कलमध्ये अतिवृष्टी; मंगरूळ मंडळात सर्वाधिक १५० मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 05:02 PM2018-08-16T17:02:28+5:302018-08-16T17:03:13+5:30
दीर्घ विश्रांतीनंतर गुरूवारी रात्री जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
उस्मानाबाद : दीर्घ विश्रांतीनंतर गुरूवारी रात्री जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये सर्वाधिक १५० मिलीमीटर पाऊस पडला. पावसाअभावी धास्तावलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
खरीप पिके जोमात असतानाच वरूणराजाने दडी मारली. जवळपास महिनाभरापासून पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनसारखी नगदी पिके धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. असे असतानाच बुधवारी चार वाजल्यानंतर रिमझीम पावसाला सुरूवात झाली. रात्री आठ वाजेनंतर पावसाने जोर धरला. पावसाची ही रिपरिप आज दुपारी बाजरा वाजेपर्यंतही सुरूच होती. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत ४७.५८ मिलीमीरट पाऊस पडला आहे. सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव मंडळात ९७ मिमी, नळदुर्ग ८०, मंगरूळ १५०, इटकळ १२५, तुळजापूर ६७, उमरगा तालुक्यातील ८१ आणि भूम तालुक्यातील भूम मंडळामध्ये ६८ मिमी पाऊस कोसळला. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.