वादळ, कोरोनाशी तोंड देत शेतातच थाटले संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:24 AM2021-06-01T04:24:32+5:302021-06-01T04:24:32+5:30
अरुण देशमुख / भूम (जि.उस्मानाबाद) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. गावांत निर्माण झालेल्या भयावह ...
अरुण देशमुख / भूम (जि.उस्मानाबाद) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. गावांत निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीमुळे अनेकांनी शेताकडची वाट धरली आहे. देवळाली हे एक असेच गाव. गावात गेल्या २६ दिवसांमध्ये १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे भेदरलेल्या सुमारे ४० टक्के ग्रामस्थांनी घराला टाळे लावून शेतातच संसार थाटला आहे. अगदी वादळाचीही तमा न बाळगता, देवळाली, उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव. या गावात कोरोनाने शिरकाव काय केला अन् पुढे ग्रामस्थांची भीतीने गाळणच उडाली. एक महिन्याच्या कालावधीत एकट्या देवळालीत १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर इतर आजाराने १० जण दगावले आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या आता कमी होत असली, तरी मृत्यूचे प्रमाण अधिक होते. ५ मे रोजी तब्बल ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि गावकऱ्यांत अधिक भीती पसरली. गावातील बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय आणि चौकाचौकात कमालीचा शुकशुकाट पाहावयास मिळाला. ग्रामस्थ एकमेकांना बोलण्यासही धजावत नव्हते. वाढत्या मृत्यूच्या कारणाने अनेकांनी थेट शेताची वाट धरली. पत्राचे शेड आणि समोर येईल, त्या परिस्थितीला तोंड देत, ग्रामस्थ शेतामध्ये दिवस काढत आहेत. या काळात दोन वेळा वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् पाऊसही झाला, तरी शेतात मुक्काम ठोकलेल्या ग्रामस्थांनी गाव जवळ केले नाही. दरम्यान, गावचे सरपंच सचिन माने, उपसरपंच सागर खराडे आणि सदस्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू ठेवले आहेत. वेळप्रसंगी पीपीई किट घालून मृतांवर अंत्यसंस्कारही केले. गावकारभारी अन् ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून आता कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. तरीही खबरदारी म्हणून आणखी काही दिवसांसाठी नागरिकांनी शेतातील मुक्काम वाढविला आहे.
प्रतिक्रिया...
गेल्या महिन्यापासून गावची स्थिती वाईट आहे. दवाखान्यात दाखल झालेला रुग्ण परत येतो की नाही, अशी अवस्था झाली होती. गावात असून वावरता येत नव्हते. घराबाहेर जाऊन आले, तरी मनात उलट-सुलट विचार येत असल्याने, आम्ही गेल्या महिन्याभरापासून शेतात शेड मारून राहत आहोत.
- बाबुराव शेटे, ग्रामस्थ देवळाली
गावातच नाही, तर गल्लीपर्यंत कोरोना पोहोचला होता. घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. घरात वयोवृद्ध आणि लहान मुलेही होती. त्यामुळे जीव मुठीत घेऊन जगण्यापेक्षा शेतात कोप करून राहत आहोत. पावसाचा सामना ठीक आहे, पण कोरोना नको, या भीतीने अनेक संकटांना सामोरे जात शेतामध्ये राहत आहोत.
- दिलीप रावसाहेब तांबे, ग्रामस्थ देवळाली
गावात जायचे म्हटले, तरी भीती वाटायला लागली आहे. ना चौकात कोणी बसत, ना ही मंदिरात कोण येत. असले दिवस उभ्या आयुष्यात पाहिले नाहीत. हे सर्व संकट दूर व्हावे आणि पुन्हा गावात खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे, हीच इच्छा आहे आता.
- भाऊसाहेब पांडुरंग गायकवाड, ग्रामस्थ देवळाली