संत गोरोबा काकांच्या घराची पडझड; संरक्षित स्मारकाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 03:38 PM2020-11-03T15:38:53+5:302020-11-03T15:44:06+5:30
मुख्य आधाराचेच लाकूड कोसळल्याने आणखी पडझडीची शक्यता आहे.
तेर (जि.उस्मानाबाद) : तेर येथील संत श्री गोरोबा काका यांचे वास्तव्य असलेल्या घराला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, याकडे पुरातत्व विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे रविवारी रात्री या घरातील माळवदाचे लाकूड तुटून पडले. त्यामुळे आणखी पडझडीची शक्यता नाकारता येत नाही.
तेर येथे संत गोरोबा काका यांचे समाधी मंदिर आहे. शिवाय, त्यांचे वास्तव्य असलेला वाडाही (घर) याठिकाणी अस्तित्वात आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने या घराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या वास्तूच्या बांधकामासाठी २०१२-१३ मध्ये २५ लाखांचा निधी खर्च करून संत गोरोबा काका यांच्या काळातील मातीच्या विटांपासून माळवदाचे घर (वाडा) तयार करण्यात आले; परंतु मातीच्या भिंती पावसात भिजून पडू लागल्याने पुन्हा २०१५-२०१६ मध्ये ७७ लाखांच्या निधीतून सिमेंटद्वारे नवीन बांधकाम करण्यात आले.
दरम्यान, माळवदासाठी वापरण्यात आलेली लाकडे निकृष्ट दर्जाची निघाली. परिणामी, लाकडांना कीड लागली. यात ते कमकुवत होऊन रविवारी रात्री अचानक ते तुटून खाली पडले. मुख्य आधाराचेच लाकूड कोसळल्याने आणखी पडझडीची शक्यता आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.