शेतीच्या बांधाचा वाद नडला; चुलत्याने दोन पुतण्यांना खोऱ्याने डोक्यात वार करून संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 PM2020-07-04T17:00:14+5:302020-07-04T17:02:21+5:30
शेतीचा बांध फोडल्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर झाला वाद
नळदुर्ग (जि़ उस्मानाबाद) : गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता शेतातील बांध फोडल्याचा जाब विचारणाऱ्या रमेश विठ्ठल यादव (४५) व गणेश गोविंद यादव (२९) या दोन पुतण्यांचा खोऱ्याच्या तुंब्याने वार करून खून करणाऱ्या सुरेश विश्वनाथ यादव (५५) या चुलत्यास पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केले आहे़ शिवाय, या प्रकरणात गुन्हा दाखल करून इतर दोन आरोपींनाही नळदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतले़
खून झाल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिप्परसे व नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, आरोपी सुरेश यादव, संभाजी यादव व चंद्रकला यादव यांना तातडीने शोध घेऊन ताब्यात घेतले़ त्यांच्याविरुद्ध नळदुर्ग ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, शुक्रवारी दुपारी दोघांचेही शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़
जाब विचारणे पडले महागात
तुळजापूर तालुक्यातील आरळी शिवारात शेतीचा बांध फोडल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या रमेश विठ्ठल यादव (४५, रा. आरळी बु.) यांना त्यांचा चुलता सुरेश विश्वनाथ यादव याने खोऱ्याच्या तुंब्याने मारहाण केली़ डोक्यात घाव बसल्याने रमेश यादव हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले़ चुलतभाऊ जागेवर कोळसल्याचे पाहून त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या गणेश गोविंद यादव (२९, रा. आरळी बु.) यालाही पाठीमागून खोऱ्याने डोक्यात मारहाण झाली़ या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला़ याघटनेनंतर चुलता सुरेश विश्वनाथ यादव (५५), त्याचा मुलगा संभाजी (२१), पत्नी चंद्रकला (४८) हे पळून गेले़