आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने पत्नीचा खून करून केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 05:18 PM2018-10-13T17:18:37+5:302018-10-13T17:19:30+5:30
आज पहाटेच्या सुमारास रामभाऊ यादव यांनी पत्नी सिताबाई यादव (वय-५०) यांच्या डोक्यात हातोडीने वार करून खून केला़
शिराढोण (उस्मानाबाद ) : नापिकी, कुक्कुट पालन व्यवसायात आलेले अपयश आणि आर्थिक विवंचनेतून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून खून करीत स्वत: गळफास घेत आत्महत्या केली़ ही खळबळजनक घटना कळंब तालुक्यातील शिराढोण येथे आज पहाटेच्या सुमारास घडली़
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील रामभाऊ गुलाब यादव (वय-५५) यांना गावच्या शिवारात तीन एकर शेती आहे़ रामभाऊ यादव व त्यांच्या पत्नी सिताबाई यादव हे शुक्रवारी रात्री शेतातील कुकुटपालन शेडमध्ये झोपले होते़. आज पहाटेच्या सुमारास रामभाऊ यादव यांनी पत्नी सिताबाई यादव (वय-५०) यांच्या डोक्यात हातोडीने वार करून खून केला़ सिताबाई यांचा खून केल्यानंतर रामभाऊ यादव यांनी तेथून जवळच असलेल्या बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली़
घटनेची माहिती मिळताच शिराढोण पोलीस, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ दरम्यान, सततच्या नापिकीमुळे यादव यांच्यासमोर आर्थिक चणचण राहत होती़ त्यातच त्यांनी सुरू केलेल्या कुक्कुट पालन व्यवसायातही त्यांना यश आले नव्हते़ आर्थिक विवंचनेमुळे आलेल्या नैराश्येतून यादव यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले़ मयत यादव दाम्पत्याच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ मयताच्या पार्थिवाचे शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले़ या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़