शेतकरी हवालदिल, झेंडूची फुले बांधावर टाकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:53 AM2021-05-05T04:53:41+5:302021-05-05T04:53:41+5:30
तामलवाडी - संपूर्ण देशभरात काेराेनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लग्नसमारंभांना ब्रेक लागला आहे. धार्मिक स्थळेही कुलूपबंद आहेत. त्यामुळे फुलांना ...
तामलवाडी - संपूर्ण देशभरात काेराेनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लग्नसमारंभांना ब्रेक लागला आहे. धार्मिक स्थळेही कुलूपबंद आहेत. त्यामुळे फुलांना मागणीच नाही. परिणामी वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या तामलवाडी येथील शेतकऱ्यांनी २२ हजार झाडांची फुले बांधावर ओतली.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शेतकरी इंद्रजित घोटकर यांनी आपल्या शेतात झेंडूच्या फुलांची लागवड केली हाेती. फुलांच्या झाडांची वाढ चांगली व्हावी, यासाठी ‘ठिबक’च्या माध्यमातून पाणी देण्यात आले. त्यामुळे फूलशेती अक्षरश: बहरली आहे. यंदा या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी घाेटकर यांना हाेती. असे असतानाच काेराेनाची दुसरी लाट आली. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याची लाट अत्यंत तीव्र स्वरूपाची आहे. दिवसागणिक आठशे ते नऊशे रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या अन्य भागांतही यापेक्षा वेगळे चित्र नाही. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी लाॅकडाऊन केले. परिणामी सर्व बाजारपेठा बंद आहेत. साेबतच लग्नसाेहळे, धार्मिक स्थळेही बंदच आहेत. त्यामुळे बाजारपेठेत फुलांना उठाव नाही. परिणामी दर प्रचंड घसरल्याने उत्पादन खर्च साेडा, वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी घाेटकर यांनी सुमारे बारा हजार झाडांची फुले बांधावर टाकून दिली. या माध्यमातून लाखाेंचे नुकसान झाल्याने शेतकरी घाेटकर यांचे अर्थकारण काेलमडून पडले आहे. अशीच अवस्था परिसरातील अन्य शेतकऱ्यांचीही झाली आहे.
चाैकट...
अर्थकारण काेलमडले...
शेतकरी घाेटकर यांनी अर्धा एकर क्षेत्रावर झेंडू, शेवंती आदी फुलांच्या झाडांची लागवड केली हाेती. या झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी ठिबक सिंचनचा वापर करण्यात आला. शेती मशागतीपासून ते फुले ताेडणीला येईपर्यंत लाखाेंचा खर्च झाला आहे. लाॅकडाऊन नसते तर या माध्यमातून दुप्पट उत्पन्न हाती पडले असते. परंतु, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने हे सर्वच गणित बिघडविले. विक्री हाेत असलेल्या फुलांच्या पैशातून वाहतूक खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी घाेटकर यांनी व्यक्त केली. अशा प्रकारामुळेच सुमारे २२ हजार झाडांची फुले बांधावर टाकली.