आर्थिक विवंचनेतून अणदूर येथील शेतमजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:43 PM2018-10-18T17:43:56+5:302018-10-18T17:44:14+5:30
: आर्थिक विवंचनेत असलेल्या एका ४६ वर्षीय शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तुळजापूर (उस्मानाबाद) : आर्थिक विवंचनेत असलेल्या एका ४६ वर्षीय शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज ऐण दसरा सणादिवशी पहाटेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारात घडली़
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील बिरु घोडके (वय-४६) हे मागील काही वर्षापासून आर्थिक अडचणीत होते़ यातच त्यांनी दोन एकर शेती विकून मोलमजुरी सुरू केली होती़ मोलमजुरी व इतर शेतकऱ्यांची शेती बटईने कसून ते उदरनिर्वाह करीत होते़ मात्र, यंदा नापिकी झाल्याने आर्थिक अडचणीत भर पडली होती़ या आर्थिक अडचणीमुळे चिंताग्रस्त झालेल्या बिरू घोडके यांनी पहाटे ऐण दसरा सणा दिवशी अणदूर नजीकच्या खंडोबा पणन संस्थेजवळील गायरानातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली़ दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे़ दरम्यान, विजया दशमीनिमित्त गावातील देवीच्या होणाऱ्या मिरवणुका जागीच विसर्जित करून ग्रामस्थांनी मयत शेतमजुराला श्रध्दांजली अर्पण केली.