उस्मानाबाद येथे कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 05:59 PM2018-08-10T17:59:07+5:302018-08-10T18:02:07+5:30
पावसाअभावी वाया जाणारी पिके आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर याला कंटाळून एका ६० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
उस्मानाबाद : पावसाअभावी वाया जाणारी पिके आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर याला कंटाळून एका ६० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी शिवारात आज सकाळी घडली.
जुनोनी येथील शेतकरी सुखदेव भगवान गायकवाड (वय-६०) यांना गावच्या शिवारात अडीच हेक्टर शेती आहे़ या शेतीतूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो़ यंदा निम्मा पावसाळा झाला तरी पाऊस पडत नसल्याने शेतातील टोमॅटो, मिरची, सोयाबीन आदी पिके हातची जात होती़ पावसाअभावी वाया जाणारी पिके आणि कुटुंबाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर याला कंटाळून सुखदेव गायकवाड यांनी शुक्रवारी सकाळी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ मयत शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे़