अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’मधून मिळावी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:01+5:302021-07-28T04:34:01+5:30
उस्मानाबाद -ऑक्टाेबर २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. अशा बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून भरीव निधी द्यावा, ...
उस्मानाबाद -ऑक्टाेबर २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. अशा बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून भरीव निधी द्यावा, अशी मागणी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहारच्या चर्चेत सहभाग नाेंदवून केली.
उस्मानाबाद जिह्यासह, बार्शी, औसा व निलंग्यासह राज्यात ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ४ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे २ लाख ६२ हजार हेक्टर इतके क्षेत्र, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ७५ हजार ७८१ शेतकऱ्यांचे ६८ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र व लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तालुक्यातील १ लाख ५२ हजार ४१७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ७७७ हेक्टर असे एकूण ६ लाख ४३ हजार ९९८ शेतकऱ्यांचे ४ लाख २६ हजार ६४५ हेक्टरवरील क्षेत्राचे तसेच जनावरे, राहत्या घरांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी ९ डिसेंबर २०२० रोजी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे ‘एनडीआरएफ’मधून ३ हजार ७२१ कोटीचा प्रस्ताव मंजूर करून निधी राज्य शासनाला वर्ग करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात २७ जुलै रोजी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रश्न उत्तराच्या तासात सहभाग घेऊन केंद्र सरकारची ‘एनडीआरएफ’ची शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर व कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी ऑक्टोबर-२०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून ७०१ कोटी मंजूर केल्याचे सांगितले. दरम्यान, सरकार वेळकाढूपणा करीत आहे. अद्याप मदतीतील छदामही मिळालेला नाही आणि रक्कमही तुटपुंजी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मदतीची रक्कम वाढवून तातडीने वितरित करावी, अशी मागणी खा. ओमराजे यांनी केली.