ऐन पेरणी हंगामात होतेय शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:54+5:302021-05-30T04:25:54+5:30

भूम : येथील खरेदी विक्री संघात १६ शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात नोंदणी करून १३४ क्विंटल हरभरा विकला होता. यास ...

Farmers are facing financial difficulties during the sowing season | ऐन पेरणी हंगामात होतेय शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

ऐन पेरणी हंगामात होतेय शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

googlenewsNext

भूम : येथील खरेदी विक्री संघात १६ शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात नोंदणी करून १३४ क्विंटल हरभरा विकला होता. यास २ महिने होऊन गेले तरी याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे झालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी या पिकाला सर्रास शेतकरी पसंती देतात. परंतु, ज्वारीतून दिवसेंदिवस उत्पन्न मिळू लागल्याने कमी कालावधीत व कमी मेहनत लागणाऱ्या हरभरा या पिकाला पसंती दिली. यामुळे तालुक्यात हरभरा या पिकाचे सरासरी क्षेत्र ३ हजार १२८ हेक्टर असताना मागील हंगामात विक्रमी ११ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. हे पीक साधारण तीन महिन्यात येत असून, यास हेक्टरी २० क्विंटलच्या आसपास उत्पन्न मिळण्याचा अंदाजदेखील कृषी विभागाच्या वतीने बांधण्यात आला होता. त्यातच प्रशासनाने हरभरा या पिकास ५ हजार १०० तर व्यापाऱ्यांकडून ४ हजार ६०० ते ७०० रुपयांनी खरेदी होत असल्याने शेतकरी खरेदी-विक्री संघाकडे धाव घेत होते. परंतु, गाडीची भरती होईपर्यंत हरभरा खरेदी करता येणार नाही, असे सांगितले जात असल्याने काही शेतकऱ्यांनी कमी भावात व्यापाऱ्यांकडे हरभरा विकला. परिणामी १६ शेतकऱ्यांचीच नोंदणी झाली होती. सदरील शेतकऱ्यांनी १३४ क्विंटल हरभरा विकून १ महिन्याच्यावर कालावधी झाला असून, अद्यापही या शेतकऱ्यांना विक्री केलेल्या हरभरा पिकाचे पैसे मिळाले नाहीत.

सध्या खरीप हंगामातील पेरणी जवळ आली असून, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. परंतु, जिल्हा पणन कार्यालयाकडून पैसे खात्यावर वर्ग होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे पैसे तातडीने जमा करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

कोट..........

खरेदी-विक्री संघात हरभरा विकून २ महिन्यांच्या जवळपास कालावधी झाला आहे. खरीप हंगामातील पेरणीचे दिवस आता जवळ आले असून, मशागत सुरू असून बी-बियाणे घेण्यासाठी पैशांची गरज आहे. वेळेत पैसे नाही मिळाल्यास खरीप हंगामातील पेरणी करण्यास अडचण निर्माण होणार आहे.

- अमोल जगदाळे, शेतकरी

सुरुवातीच्या काळात पेमेंट लवकर झाले. परंतु, लॉकडाऊनमुळे वेअर हाऊसकडून पेमेंट मिळण्यास विलंब होत आहे. पुढील आठवड्यात राहिलेले पेमेंट देखील येईल. ते आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाईल.

- महेश वाजपेयी, जिल्हा पणन अधिकारी, उस्मानाबाद

Web Title: Farmers are facing financial difficulties during the sowing season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.