कळंब येथे रोहित्राच्या मागणीसाठी शेतकरी चढले झाडावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:27 PM2018-09-10T18:27:13+5:302018-09-10T18:27:57+5:30
तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुक्यातील रांजणीच्या शेतकऱ्यांनी आज शोलेस्टाईल आंदोलन केले़
कळंब (उस्मानाबाद) : वारंवार बिघडणाऱ्या रोहित्राच्या दुरुस्तीकडे तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुक्यातील रांजणीच्या शेतकऱ्यांनी आज शोलेस्टाईल आंदोलन केले़ महावितरणच्या कार्यालयातीलच एका झाडावर चढून शेतकऱ्यांनी वरून उड्या टाकण्याची धमकी अधिकाऱ्यांना दिली़
रांजणी येथे महावितरण कंपनीने शेतीपंपास सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी १०० केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केलेले आहे. यात वारंवार बिघाड होत असल्याने सिंचनात बाधा येत आहे़ ही बाब या भागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या वेळोवेळी लक्षात आणून देत याठिकाणी २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी केलेली आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने २९ आॅगस्ट रोजी पुन्हा गणेश श्रीरंग गाडे, मोहिनुद्दीन सय्यद, अच्युत भालेकर, मच्छिंद्र काळे, गोरख काळे, जगन्नाथ चोपणे आदी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला़ तरीही रोहित्राकडे दुर्लक्ष केले गेल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी कळंब येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रांजणी येथील समस्याग्रस्त शेतकरी गणेश श्रीरंग गाडे, सुशील आत्माराम राऊत, बाबा सय्यद आदी शेतकरी महावितरणच्या कळंब येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर एकत्र आले. याठिकाणी त्यांनी आपले आंदोलन सुरू केले. दरम्यान, जमलेल्यापैकी तीन शेतकरी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उंच निलगिरीच्या झाडावर चढले. त्यांनी आमची मागणी मान्य केल्याशिवाय खाली उतरणार नाहीत अशी आग्रही भूमिका घेतली होती. या शोलेस्टाईल आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे...
कळंब येथे नव्याने रूजू झालेले महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ए. एन. शेख यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून लवकरात-लवकर रांजणी येथील रोहित्राचा प्रश्न मार्गी लावू, असे लेखी आश्वासन दिले. यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.