हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारात हरभरा विक्रीवर शेतकऱ्यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:28+5:302021-06-06T04:24:28+5:30
उस्मानाबाद : आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात २१ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. हरभरा विक्रीसाठी २२०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. ...
उस्मानाबाद : आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात २१ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. हरभरा विक्रीसाठी २२०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र, खुल्या बाजारात अधिक दर असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा ओढा कमी आहे. २१ केंद्रांवर ८ हजार २१२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली हाेती. त्यापैकी १६ केंद्रांवर २ हजार २६६ शेतकऱ्यांनी हरभरा विक्री केला आहे, तर ५ केंद्रांवर खरेदी शून्य झाली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात परतीचा दमदार पाऊस झाला होता. या पावसामुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली होती. मात्र, दुसरीकडे प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने रब्बी हंगामातील पाण्याचा प्रश्न मिटला. मुबलक पाणी व पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी उरकून घेतल्या. ज्वारी, गव्हासोबतच हरभऱ्याचाही पेरा केला. निसर्गाच्या कृपेने हरभरा पीक चांगले आले. कष्टाने पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. केंद्र शासनाने आधारभूत किमतीनुसार हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये दर निश्चित केला. शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी २१ केंद्र कार्यान्वितही केली आहेत. या केंद्रांवर १५ फेब्रुवारीपासून नोंदणीला सुरुवात झाली होती. ८ हजार २१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी २ हजार २६६ शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाले. २१ केंद्रांपैकी १६ केंद्रांवर २५ हजार ५८१ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे, तर ५ केंद्रांवर खरेदी शून्य आहे.
चौकट...
केंद्र शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. आडतीवर ४ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. मात्र, अनेक शेतकरी केंद्रावर पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने शिवाय चाळणी व हमालीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आडतीवर क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयाने कमी भाव मिळत असला, तरी लवकर पैसे मिळत असल्याचे सांगण्यात आले.
कोट...
जिल्ह्यात २१ हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ८ हजार २१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्वच शेतकऱ्यांना संदेश पाठिवण्यात आले आहेत. २ हजार २६६ शेतकऱ्यांचा २५ हजार ५८१ क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. १३ कोटी रुपयांची रक्कम त्यांना वितरीत करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यांचा हरभरा विक्रीचा राहिला आहे त्यांनी २५ जूनपर्यंत हरभरा विक्रीसाठी घेऊन यावा.
- व्ही. एच. वाचपेयी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.