शेतकऱ्यांना पिकांवरील कीड, रोगांची ओळख आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:16+5:302021-07-16T04:23:16+5:30
उमरगा : शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकावरील रोग व किडीची ओळख असणे आवश्यक असून, ...
उमरगा : शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकावरील रोग व किडीची ओळख असणे आवश्यक असून, बीजप्रक्रिया करून लागवड करणे फायदेशीर ठरणारे आहे, असे मत शेती शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी व्यक्त केले.
तालुका कृषी विभाग व शेतकरी शांतिदूत परिवार यांच्या वतीने तालुका व परिसरातील शेतकऱ्यांसाठी खरीप पिके व फळबाग लागवड या विषयावर बुधवारी ‘शेतकरी - शास्त्रज्ञ परिसंवाद’ येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी, कीडरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे, फळबाग तज्ज्ञ डॉ. गणेश मंडलिक, मृद शास्त्रज्ञ डॉ. भगवान अरबाड, हवामान तज्ज्ञ नुकुल हरवाडीकर, शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव, तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव, माजी कृषी अधिकारी एम.एस. जाधव, प्रा. युसुफ मुल्ला आदींची उपस्थिती होती.
डॉ. भागवत अरबाड यांनी सेंद्रिय खत हा जमिनीचा आत्मा असून, शेतीमध्ये जैविक खताचा वापर करावा व गांडूळ खत शेतीला फायदेशीर असल्याचे सांगितले. डॉ. गणेश मंडलिक यांनी शेतकऱ्यांनी फळबागाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून पहावे. शेती करण्यापूर्वी माती आणि पाण्याचे परीक्षण महत्त्वाचे असून, रोपे खरेदी करत असताना मान्यताप्राप्त नर्सरीमधूनच घेण्याचे आवाहन केले. हवामान तज्ज्ञ नकुल हरवाडीकर यांनी शेतीपूर्वक हवामानाचा अंदाज व पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. तुळजापूर येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांनी शेती करत असताना तज्ज्ञांचे मत घ्यावे, असे सांगितले.
डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी शेती व शेतकरी यांना प्रतिष्ठा मिळावी, शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्षीय समारोपप्रसंगी सांगितले. यावेळी समाजसेविका शकुंतला मोरे, माजी सरपंच विलास व्हटकर, भूमिपुत्र वाघ यांचीही उपस्थिती होती. प्रा. जीवन जाधव, गणेश गरुड, प्रा. अभय हिरास, करीम शेख, किशोर औरादे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.