विजेसाठी शेतकऱ्यांनी उपकेंद्रात दिला ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:36 AM2021-08-12T04:36:59+5:302021-08-12T04:36:59+5:30
पावसाने उघडीप दिल्यामुळे खरिपाची पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकरी विहिरी व विंधन विहिरीच्या जेमतेम पाण्यावर खरिपातील ...
पावसाने उघडीप दिल्यामुळे खरिपाची पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकरी विहिरी व विंधन विहिरीच्या जेमतेम पाण्यावर खरिपातील पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथील ३३/११ उपकेंद्रांतील पारा फीडरवरून वाशीसह कवडेवाडी व सारोळा (वा.) शिवारास वीज पुरवठा केला जात आहे. मात्र, या फीडरवर जास्तीचा लोड असल्यामुळे कवडेवाडी व सारोळा या ठिकाणच्या विद्युत पंपांना एक दिवसाआड वीज पुरवठा केला जात आहे. मात्र, तरीही उच्च पुरवठा होत नसल्यामुळे पंप नादुरुस्त होणे व बंद पडणे, असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वाशी येथील ३३/११ उपकेंद्रातील ऑपरेटरला जाब विचार वीज पुरवठा बंद करण्यास भाग पाडले. यावेळी कार्यालयात एकही वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी हजर नसल्यामुळे अधिकारी येईपर्यंत वीज पुरवठा सुरू करू देणार नसल्याचे सांगत तेथेच ठिय्या मांडला. यावेळी कार्यालयात एकही वरिष्ठ अधिकारी हजर नसल्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्याची पंचाईत झाली. उपकेंद्राचे सहायक अभियंता रमेश शेंद्रे यांना फोन केल्यानंतर ते उशिराने कार्यालयात हजर झाले. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. दरम्यान, शेंद्रे यांनी शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.