शेतकरीपूत्र जागीच ठार : भाजीपाला विकून गावाकडे परतताना दुचाकीला कंटेनरने उडवले
By बाबुराव चव्हाण | Published: August 27, 2023 07:35 PM2023-08-27T19:35:35+5:302023-08-27T19:35:46+5:30
एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबाचा आधार गेला...
येणेगूर (जि. धाराशिव) : शेतात पिकविलेला भाजीपाला मुरूम येथील बाजारपेठेत विक्री करून गावाकडे परतत असतानाच भरधाव कंटेनेरने दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात ३३ वर्षीय शेतकरीपूत्र जागीच ठार झाला. एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबाचा आधार गेला आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुरूम मोड येथे घडली.
उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील ज्ञानेश्वर युवराज माने (३३) हे रविवारी भाजीपाला घेऊन मुरूमच्या बाजारात गेले हाेते. भाजीपाला विक्री करून साधारपणे दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ते आपल्या गावाकडे परतत हाेते. त्यांची दुचाकी मुरूम माेडनजीक आली असता, नळदुर्गहून उमरग्याकडे निघालेल्या भरधाव कंटेनरने (क्र. एनएल.०१/२२९०) जाेराची धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर माने जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकी अक्षरश: चक्काचूर झाली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच येणेगूर दूरक्षेत्रचे पोहेकाॅं. संजय शिंदे, मारूती मडोळे, मसाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. मुरूम पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली असून पुढील तपास पाेहेकाॅं. संजय शिंदे हे करीत आहेत. दरम्यान, मयत ज्ञानेश्वर हा, एकुलता एक मुलगा हाेता. ताेही या अपघाती घटनेत गमावला. त्यामुळे माने कुटुंबाचा आधार गेला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दाेन मुले असा परिवार आहेत.
चालकाने केला पाेबारा...
उमरग्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्यानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पाेबारा केला. पाेलीस आता संबंधित चालकाचा शाेध घेत आहेत.