शेतकऱ्याच्या मुलाचे यूपीएससी परीक्षेत यश, मिळवला ३०४ वा रँक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 23:54 IST2025-04-22T23:53:42+5:302025-04-22T23:54:00+5:30
मुकुंद चेडे - वाशी (जि. धाराशिव) : प्रयोगशील शेतकरी दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या लेकाने त्यांच्या कष्टाची उतराई करीत केंद्रीय लोकसेवा ...

शेतकऱ्याच्या मुलाचे यूपीएससी परीक्षेत यश, मिळवला ३०४ वा रँक
मुकुंद चेडे -
वाशी (जि. धाराशिव) : प्रयोगशील शेतकरी दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या लेकाने त्यांच्या कष्टाची उतराई करीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली आहे. सटवाईवाडी येथील पुष्पराज खोत याने या परीक्षेत ३०४ वा रँक मिळवला आणि आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
वाशी तालुक्यातील सटवाईवाडी येथील पुष्पराज याचे आई व वडील हे दोघेही शेतकरी. त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या या पुत्ररत्नाने आपले प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत पूर्ण केले. यानंतर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण तेरखेडा येथील गणेश विद्यालयातून पूर्ण केले. पुढे लातूरच्या शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर अकरावी व बारावी येथून केली. आई, वडील शेतकरी असल्याने चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्यानंतरही त्याने कृषी पदवीसाठी पुण्याच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथून कृषी पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी म्हणून नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे तो रुजू झाला. मात्र, स्वप्न मोठे असल्याने नोकरी सोबतच त्याने अभ्यासही सुरू ठेवला होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेली परीक्षा तो मंगळवारी जाहीर झालेल्या निकालातून ३०४ रँकने उत्तीर्ण झाला. या यशाचे गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव...
वाशी तालुक्यातील सटवाईवाडी हे गाव प्रयोगशील शेतकऱ्यांचे म्हणून ओळखले जाते. सिंचन सुविधा असली तरी उसाच्या मोहात न अडकता भाजीपाला, फळ लागवडीकडे येथील शेतकऱ्यांच्या अधिक कल आहे.
उशिरापर्यंत मिरवणूक...
पुष्पराज खोत उत्तीर्ण झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याची गावातून मिरवणूक काढली. रात्री उशिरापर्यंत गुलालाची उधळण करीत ही मिरवणूक सुरूच होती.