तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली
By गणेश कुलकर्णी | Published: September 12, 2023 06:13 PM2023-09-12T18:13:52+5:302023-09-12T18:16:37+5:30
तीन गावच्या शेतकऱ्यांचे आंदोलन; नगर रोडवरील वाहतूक ठप्प
धाराशिव : कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेंतर्गत होणाऱ्या भूम तालुक्यातील हिवर्डा ते सोनगिरी कालव्यातून गोरमाळा तलावात पाणी सोडण्याची तरदूत करावी, अशी मागणी करीत गोरमाळा, वरुड व बऱ्हाणपूर येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी रस्ता रोखून आंदोलन केले. गोरमाळा फाटा ते नगर रोडवर केलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे व प्रभारी नायब तहसीलदार अनिल महामुनी यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे, तालुक्यात गेल्या काही वर्षांत सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावानजीकचे अनेक शेतकरी शहराकडे स्थलांतरित होत आहेत. हे स्थलांतरण रोखण्यासाठी गोरमाळा तलावात दरवर्षी पाणी सोडणे आवश्यक आहे. गोदावरी खोरे विकास महामंडळाअंतर्गत येणारा गोरमाळा लघू तलाव गेल्या अनेक वर्षांपासून कोरडा राहत आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यातून या तलावासाठी पाण्याची तरदूत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात गोरमाळा सरपंच अमोल औताडे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, अमृत भोरे, प्रवीण खटाळ, दत्तात्रय चव्हाण, अतुल शेळके, चुंबळी सरपंच कानिफनाथ गिराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे, भरत नलवडे, बाळू नलवडे, संभाजी नलवडे, सतीश वारे, भरत नलवडे, आबासाहेब पिंगळे, निशिकांत शेळके, दत्तात्रय औताडे, सूर्यकांत औताडे, शिवाजी औताडे, आश्रुबा चोरमले, विलास क्षीरसागर, अण्णासाहेब तांबे यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
...तर अनेक गावांचा पाणीप्रश्न लागेल मार्गी
या तलावात हिवर्डा ते सोनगिरी कालव्यातून पाणी सोडल्यास परिसरातील १२ ते १५ गावांचा पिण्याच्या पिण्याचा प्रश्न तर कायमस्वरूपी मार्गी लागेलच, शिवाय तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचीही सोय होईल, असे आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे.