बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:33 AM2021-03-17T04:33:14+5:302021-03-17T04:33:14+5:30
तामलवाडी : मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने बागांना पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी ...
तामलवाडी : मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने बागांना पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी यासाठी द्राक्ष झाडाच्या बुंध्याला ओलावा टिकून राहण्यासाठी सोयाबीनचे भुस्कट, उसाचे पाचट द्राक्षाचा झाडाभोवताली लावून मलचिंग करण्यात येत आहे.
तामलवाडी भागात द्राक्षबागेचे क्षेत्र दुप्पटीने वाढत चालले आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बागायदार शेतकऱ्यांनी माळरानावर पिकविलेली द्राक्ष परदेशात विक्रीसाठी जात आहेत. ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यावर फळबागा घेण्याकडे कल वाढला आहे. दरम्यान, मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान ३५ अंशांवर गेले आहे. त्यामुळे द्राक्ष तोडणीनंतर झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीला भेगा पडून द्राक्षवेलीला धोका पोहोचू शकतो. हा धोका ओळखून बुडाजवळ जमिनीची धूप थांबविण्यासाठी झाडाशेजारी सोयाबीनचे भुसकट, उसाचे पाचट अंथरुण झाडाला दिलेल्या पाण्याचा ओलावा टिकून राहण्यासाठी मलचिंग केले जात आहे. त्यासाठीचा खर्च वाढला असला, तरी बागा जगविण्यासाठी हा खर्च करणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
चौकट
पाचटाला आला भाव
उसतोडणीनंतर फडात राहणारे शिल्लक पाचट पूर्वी शेतकरी जाळून टाकत. मात्र, द्राक्षबागेचे वाढलेले क्षेत्र पाहता, बागायतदार ते पाचट ऊसउत्पादक शेतकऱ्यांकडून मशीनद्वारे गाठी बांधून घेत आहेत. एका पाचटाच्या गाठीसाठी २० रुपये मोजावे असून, वाहतूक, बागेत अंथरणे, यासाठी १० रुपये खर्च असा एकूण एका पाचटाच्या गाठीसाठी ३० रुपये खर्च येतो. त्यामुळे एकरी वर्षभरासाठी ३ लाख रुपये खर्च करावा लागत आहे
कोट...........
काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत २२ गावांतून २५० शेतकऱ्यांनी द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी ६० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष निर्यात प्रमाणपत्र कृषी कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० टन द्राक्ष निर्यात झाले असून, मार्च महिन्यात द्राक्ष परदेशात निर्यात होण्यास गती येईल.
- आनंद पाटील, मंडळ कृषी अधिकारी, काटी, ता.तुळजापूर
देशभरात झालेल्या इंधन दरवाढीचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसू लागला आहे. द्राक्षबागेत फवारणीसाठी वापरण्यात येणारी फवारणी यंत्र, ट्रॅक्टर, तसेच माल वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांना इंधनाची गरज भासते. बाजारात द्राक्षाला मिळणारा भाव अन् उत्पादनांसाठी होणारा खर्च पाहता, इंधनाची दरवाढ द्राक्ष बागायतदारांना अडचणीची ठरली आहे.
- राजाभाऊ मोटे, शेतकरी, गोंधळवाडी