धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाली पलटी; २६ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 11:23 AM2023-06-03T11:23:11+5:302023-06-03T12:20:05+5:30
धाराशिवमध्ये एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
धाराशिवमध्ये एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात २६ जण जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना परांडा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात चालक गंभीर जखमी झाले आहेत.
चालक गंभीर जखमी झाल्याने त्यांना बार्शी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेली माहिती अशी, भररस्त्यात ओव्हरटेक करणाऱ्या जीपला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने बस खड्ड्यात घातली. या घटनेत बसमधील २६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शी व परंडा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
परंडा बसस्थानकातून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रवासी घेऊन एमएच २० बीएल २१९२ क्रमांकाची बस ही बार्शी मार्गे धाराशिवकडे निघाली होती. शहरापासून काही अंतर पुढे गेल्यानंतर सोनगिरी नदी ओलांडताच मागून एक जीप बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. याचवेळी समोरुन एक कंटेनर येत होता. जीप ओव्हरटेक करताना कंटेनरवर आदळण्याची शक्यता निर्माण झाल्याने बसचालकाने आपली बस रस्त्याखाली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात जावून उलटली. या घटनेत बसमधील २६ प्रवासी जखमी झाले आहेत.
यापैकी जवळपास २० प्रवाश्यांवर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात तर सहा प्रवाश्यांवर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. अपघात घडताच रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांनी पोलिसांनी माहिती कळवून प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले होते. नंतर पोलिसांनी रुग्णवाहिका व अन्य वाहनांची मदत घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. या घटनेत कोणत्याही प्रवाश्यांची प्रकृती गंभीर नसल्याचे एसटी महामंडळाच्या धाराशिव विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.