शाळा बंद असतानाही फी वसुली मात्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:22 AM2021-07-01T04:22:48+5:302021-07-01T04:22:48+5:30
उमरगा : तालुक्यात इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा बंद असल्या तरी पालकांकडून सक्तीने फी वसूल केली जात असल्याचे सांगत ...
उमरगा : तालुक्यात इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा बंद असल्या तरी पालकांकडून सक्तीने फी वसूल केली जात असल्याचे सांगत ही वसुली बंद करावी, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार संजय पवार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत. महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांची फी आकारू नये असे आदेश दिले आहेत. असे असतानाही काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा व इतर काही शैक्षणिक संस्था विद्यार्थी व पालकांकडून सक्तीने फीची वसुली करीत आहेत. फी न दिल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकणे, पुस्तके घेऊ न देणे असा त्रास दिला जात आहे. शाळा बंद असतानाही लाखो रुपयांची वसुली फीच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना फी माफ करण्याबाबतचे आदेश द्यावेत. अन्यथा शाळांना टाळे ठोको आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, उमरगा युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष समर्थ सुरवसे, अल्पसंख्याक विधानसभा युवक अध्यक्ष मोहसीन पटेल, मुरूम विद्यार्थी शहराध्यक्ष सूरज सूर्यवंशी, फयाज पठाण, ओमकार फुकटे, अजिंक्य बिराजदार, जुबेर पटेल, फयाज पटेल, विशाल मुगळे, समीर शेख, किरण कांबळे, सोमनाथ कांबळे, निसार शेख, अनिकेत तेलंग, संजय अंगबरे, कृष्णा पाटील आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.