उपेक्षित कलाकाराच्या कुंचल्यातून पन्नासएक शाळांच्या भिंती झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:28 AM2021-03-15T04:28:56+5:302021-03-15T04:28:56+5:30
कळंब : वर्ग, व्हरांडा असो की शाळेची भिंत... जिकडं पहावं तिकडून मिळतं ते ज्ञानच ज्ञान... होय, एका उपेक्षित कलाकाराच्या ...
कळंब : वर्ग, व्हरांडा असो की शाळेची भिंत... जिकडं पहावं तिकडून मिळतं ते ज्ञानच ज्ञान... होय, एका उपेक्षित कलाकाराच्या कुंचल्यातून पन्नासएक शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. चिमुरड्यांना चित्रसंपदेतून ज्ञानसंपदा आत्मसात करणे सहजसाध्य करणाऱ्या या अवलियाचे नाव आहे पंडित वाघमारे.
तालुक्यातील भाटशिरपुरा येथील रहिवासी असलेले पंडित सुखदेव वाघमारे हे एक उपेक्षित; परंतु हाती जादूई कला असलेले व्यक्तिमत्त्व. वडिलांचं अपंगत्व व घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे कला शिक्षणाची ओढ व आवड असतानाही त्यांचा प्रवास ‘एटीडी’वरच थांबला. यानंतर त्यांच्या कल्पक कुंचल्याला म्हणावा असा वाव मिळाला नाही.
परंतु कलेची साधना सुरूच होती. याचदरम्यान गावोगावच्या जि. प. शाळेत बदलाचे वारे वाहू लागले. एका शिक्षकाने या हरहुन्नरी कलाकारावर शाळेचा कायापालट करण्याची जबाबदारी सोपवली. मग काय, डोक्यातील भन्नाट कल्पना, हातामधील कुंचल्याची जादुई कला, अभ्यासक्रमातील घटक व शिक्षकांना अपेक्षित असलेला मजकूर यांची योग्य सांगड घालत पंडित वाघमारे यांनी पन्नासवर शाळांचे रूपडेच पालटले. वर्ग, व्हरांडा, आंतर्बाह्य भिंती अशी सारी शाळा रंगात न्हाऊन निघाली. कळंब, केज व उस्मानाबाद या तालुक्यात आज पंडितरावांच्या कुंचल्याचा स्पर्श झालेल्या शाळा शहरी शाळांनाही ‘बॅकबेंच’ करतील, अशा ठरल्या आहेत. एकूणच जि. प. च्या डिजिटल होत असलेल्या शाळा उपक्रमशील व टेक्नोसॅव्ही शिक्षकांची कार्यशीलता यासह झालेल्या भौतिक सुधारणांमुळ कात टाकत असतानाच पंडितरावांनी कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या शाळा आकर्षक करत आपली साधना वास्तवात उतरली आहे.
शाळेची भिंत हाच ‘कॅनव्हास’
अस्सल ग्रामीण मातीत तयार झालेले चित्रकार पंडित वाघमारे यांना परिस्थितीमुळे मोठा ‘प्लॅटफॉर्म’ मिळाला नाही. यामुळे पंखात बळ असतानाही भरारी घेणं शक्य झालं नाही. कोणी कदरवान त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. अशा स्थितीत जलरंगात खास माहिरता प्राप्त केलेल्या वाघमारे यांच्यासाठी जि. प. शाळेच्या भिंतीच ‘कॅनव्हास’ ठरल्या अन् कलेला वाव, ‘स्पेस’ मिळाला. हे काम पैशात मोजता येत नसलं, तरी यातून निर्माण होणारा आनंद अपरिमित आहे, असं पंडित वाघमारे यांनी सांगतात.
जिकडे तिकडे ज्ञानाचे धडे
पंडित वाघमारे हे शिक्षकांना वर्गात काय अपेक्षित आहे, हे जाणून घेतात. त्यानंतर त्या वर्गाची पुस्तकं चाळत काही घटक निवडतात. त्यातील महत्त्वाचे घटक निश्चित करून ते वर्गात चित्ररूपी मांडतात. वर्गाच्या आतील भिंती, व्हरांडा, छत, बाह्यभिंती अशा सर्व दृश्य भागात मग पंडितरावांच्या कुंचल्यातून उतरते ती त्यांचीच कल्पक ‘डोक्यालिटी’. मग निसर्ग चित्र, तक्ते, थ्री डी आर्ट अशा विविध प्रकारांत शालेय अभ्यासक्रमातील घटक, सामान्य ज्ञान मांडून विद्यार्थ्यांची ज्ञानकक्षा वाढवल्या जातात. सहजसोप्या, आनंददायी पद्धतीने शिक्षण देण्यास ही चित्रसंपदा कामी येते.
विलासराव देशमुख यांनी केलं होतं कौतुक
पंडितरावांच्या कलेला ‘गल्ली ते दिल्ली’ अशी दाद मिळाली नसली, तरी विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना पंडित वाघमारे यांच्या कलेचे कौतुक करत पाठीवर थाप टाकली होती. व्यक्तिचित्रण स्पर्धेत दगडोजीराव देशमुख यांचे पंडित वाघमारे यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र अव्वल ठरले होते. यावेळी विलासराव देशमुख यांनी केलेला गौरव आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असल्याचे पंडित वाघमारे सांगतात.
पॉईंटर
पंडित वाघमारे यांच्या चित्रकलेतून पन्नासवर शाळांच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. त्याचा दर्जा, कलात्मकता, घटक सूक्ष्मता वाखाणण्याजोगी आहे.
त्यांनी स्वतः वनलाईन पेंटिंग आकारास आणली असून, यात त्यांचा हातखंडा आहे. परंतु, पुढे तिला वाव मिळाला नाही. त्यांच्याकडून ही कला शिकलेल्या मंडळींची कला कॅनडात सादर झाली, हे विशेष.
मोठ्या शहरात प्रदर्शनासाठी वाव मिळत नसल्याने त्यांनी यापूर्वी खामसवाडी, कळंब, भाटशिरपुरा येथे चित्रप्रदर्शन भरवले होते.