‘पीएम किसान’ अनुदानाबाबत शेतकऱ्यांना अंतिम नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:58+5:302020-12-25T04:25:58+5:30
परंडा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी परंडा तालुक्यातील ७५० आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती भरून ...
परंडा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी परंडा तालुक्यातील ७५० आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती भरून ७२ लाख ८० हजार रूपये शासनाची फसवणूक करून उचलले आहेत. त्यामुळे ही रक्कम ७ दिवसात सरकार दरबारी भरणा करावी, अशी अंतिम नोटीस तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रूपये अनुदान टप्याटप्प्याने त्यांच्या खात्यावर त्यांच्या थेट जमा केले जाते. मात्र, या योजनेचा लाभ नोकरदारांना आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना घेता येत नाही, असे स्पष्ट आदेश आहेत. असे असतानाही परंडा तालुक्यातील नोकरदार व आयकर भरणाऱ्या ७५० शेतकऱ्यांनी चुकीची माहिती भरून ७२ लाख ८० हजार रूपये रक्कम उचलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर उचललेली रक्कम वसूल करण्यासाठी महसूल प्रशासनाने अंतिम नोटीसा दिल्या आहेत.
अपात्र लाभार्थ्यांनी नोटीस मिळताच राष्ट्रीयकृत बँक अथवा तहसीलच्या खात्यावर किंवा तलाठी यांच्याकडे धनादेशाद्वारे मिळालेली रक्कम जमा करून त्याची रितसर पावती घ्यावी. ही रक्कम ७ दिवसात जमा न केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे अपात्र शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीसात तहसीलदारांनी म्हटले आहे.
चौकट.....
अपात्र शेतकऱ्यांना वसुली नोटीस मिळताच काहींनी उचलेली रक्कम परत करण्यास सुरूवात केली आहे. दीड लाखापर्यंत रक्कम सरकार जमा करण्यात आल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.