अखेर बसस्थानकावर झळकले धाराशिव, पाट्याही बदलणार
By सूरज पाचपिंडे | Published: March 1, 2023 06:47 PM2023-03-01T18:47:53+5:302023-03-01T18:48:07+5:30
उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव झाल्यानंतर तालुका, जिल्ह्याचे नावही धाराशिव करण्याबाबत शासनाकडून मंजूरी मिळाली मिळाली आहे.
धाराशिव : शहर, तालुका, जिल्ह्याचे नाव धाराशिव झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील सर्व आगारांना उस्मानाबाद ऐवजी धाराशिव नाव वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने अंमलबजावणीस सुरुवात झाली असून, बुधवारी मध्यवर्ती बसस्थानकाचे फलकावर धाराशिव नाव लिहिण्यात आले आहे.
उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव झाल्यानंतर तालुका, जिल्ह्याचे नावही धाराशिव करण्याबाबत शासनाकडून मंजूरी मिळाली मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी बसेसच्या पाट्या बदलण्याबाबत आदेश जिल्ह्यातील सर्व आगारांना मंगळवारी दिले आहेत. त्या अनुषंगाने धाराशिव आगाराने काम हाती घेतले आहे. बुधवारी बसस्थानकाचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. शिवाय, आगारातील बसेसच्या पाट्या बदलण्याचे कामही सुरु असून, दोन दिवसात आगारातील सर्व बसेसच्या पाट्या बदलण्यात येणार आहेत. काही बसेसवरील पाट्या बदलण्यातही आल्या आहेत. पाट्या बदलण्यासाठी धाराशिव आगाराचा १५ हजार रुपयांचा खर्च होणार आहे.
उद्घोषणेतही झाला बदल
मध्यवर्ती बसस्थानकातून विविध मार्गावर बसेस धावत असतात. मार्गस्थ होणाऱ्या बस गाड्यांची उद्घोषणेतेही बुधवारपासून बदल करण्यात आला आहे.
तिकिटावर दिसणार धाराशिव
राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील तिकिटावरील नावही बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुरुवारपासून तिकिटावरही धाराशिव असा शहराचा उल्लेख असेल, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
इतर आगाराकडून अंमलबजावणी
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव आगाराप्रमाणेच उमरगा, भूम, कळंब, तुळजापूर, परंडा या आगारातील बसेसच्या पाट्या बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्या सर्व आगारातील बसेसवर आता उस्मानाबाद ऐवजी धाराशिव नाव वाचावयास मिळणार आहे.