एसटी महामंडळ झुकले, अखेर सोशल मीडियातील 'रील'स्टार महिला वाहकाचे निलंबन मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 08:14 PM2022-10-13T20:14:18+5:302022-10-13T20:17:29+5:30
विविध स्तरातून होत असलेली टीका आणि वाढत्या दबावामुळे महामंडळाने आज निलंबन मागे घेतल्याचे दोन ओळींचे पत्र काढले.
कळंब (जि.उस्मानाबाद) : कळंब आगारातील सोशल मिडियावरील 'रील'स्टार महिला वाहक मंगल गिरी यांच्यावर काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, विविध स्तरातून दबाव वाढल्यानंतर आज आगार व्यवस्थापकांनी त्यांचे निलंबन मागे घेतले आहे.
कळंब आगारातील महिला वाहक मंगल गिरी या सोशल मिडीयावर सक्रीय आहेत. विविध रील्सच्या माध्यमातून त्या लोकप्रिय झाल्या होत्या. मात्र, त्यांचे वर्तन महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत १ ऑक्टोबर रोजी गिरी यांना निलंबित करण्यात आले होते. सोबतच वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांनाही निलंबित करण्यात आले. त्यानंतर या निर्णयावरून महामंडळाला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. अनेक राजकीय नेत्यांनी याची दखल घेत गिरी यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती.
दरम्यान, विविध स्तरातून होत असलेली टीका आणि वाढत्या दबावामुळे महामंडळाने आज निलंबनाच्या निर्णयावर फेरविचार केला. कळंबच्या आगार व्यवस्थापकांनी दोनच ओळींचे पत्र काढून निलंबन आदेश मागे घेत असल्याचे गिरी व कुंभार यांना कळविले आहे.