..अखेर उपकेंद्रातील ट्रान्स्फार्मर बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:51+5:302021-04-28T04:34:51+5:30
वाशी : येथील ३३/११ उपकेंद्रातील पाच एमव्हीएचा जळालेला ट्रान्स्फार्मर अवघ्या आठ दिवसाच्या आत बदलण्यात आला असून, यामुळे वारंवार खंडित ...
वाशी : येथील ३३/११ उपकेंद्रातील पाच एमव्हीएचा जळालेला ट्रान्स्फार्मर अवघ्या आठ दिवसाच्या आत बदलण्यात आला असून, यामुळे वारंवार खंडित होणारा विद्युतपुरवठा आता सुरळीत होणार आहे. सदरील ट्रान्स्फार्मर तात्काळ बसवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठपुरवा केला होता. वाशी येथील ३३/११ उपकेंद्रातील पाच एमव्हीएचा ट्रान्स्फार्मर मागील आठवड्यात जळाला होता. यामुळे एकाच ट्रान्स्फार्मरवर अतिरिक्त दाब निर्माण झाला होता. ट्रान्स्फार्मर जळाल्यानंतर वाशी शहरासह परिसरातील काही गावे अंधारात बुडाली होती. शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पशुधनास पाण्यासाठी भटकंती करावी लागली. ३० तासांनंतर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोष दूर करत पशुधनास पाणी उपलब्ध करून दिले. दरम्यान, हा दोष दूर होतो ना होतो तोच उपकेंद्रातील पाच एमव्हीए क्षमतेचा दुसरा ट्रान्स्फार्मर जळाला. त्यामुळे पुन्हा एकाच ट्रान्स्फार्मरवर भार वाढला होता. या ट्रान्स्फार्मर दुरुस्तीसाठी किमान दोन ते तीन आठवडे वेळ लागणार असल्याची माहिती शिवसेना नेते प्रशांत चेडे यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ खासदार ओमराजे निंबाळकर यांना कल्पना देत आपण यामध्ये लक्ष घालून तात्काळ ट्रान्स्फार्मर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली. यावर खासदारांनी उस्मानाबाद येथील वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी विचारविनिमय करत वाशीचा ट्रा्न्स्फार्मर युद्धपातळीवर बसविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना केल्या. यानुसार वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालत औरंगाबाद येथून ट्रान्स्फार्मर उपलब्ध करून घेण्यात यश मिळवले असून, मंगळवारी ट्रान्स्फार्मर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले. याकामी येथील वीज कंपनीचे अभियंता रमेश शेंद्रे, अभियंत्या रेणुका पत्की व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो ओळ- वाशी येथील वीज उपकेंद्रातील जळालेला पाच एमव्हीएचा ट्रान्स्फार्मर बसविण्याचे काम करताना औरंगाबाद येथील कर्मचारी.