पगारी थकल्याने २५७ शिक्षकांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:33 AM2021-02-24T04:33:43+5:302021-02-24T04:33:43+5:30

उमरगा : कोरोनाच्या कठीण काळातही जिल्हा परिषद माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन धडे देणाऱ्या व सध्या ...

Financial dilemma of 257 teachers due to salary fatigue | पगारी थकल्याने २५७ शिक्षकांची आर्थिक कोंडी

पगारी थकल्याने २५७ शिक्षकांची आर्थिक कोंडी

googlenewsNext

उमरगा : कोरोनाच्या कठीण काळातही जिल्हा परिषद माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन धडे देणाऱ्या व सध्या ऑफलाईन शिकवणाऱ्या जिल्ह्यातील २५७ शिक्षकांना फेब्रुवारी महिना सरत आला असतानाही डिसेंबर व जानेवारी महिन्याचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे हे शिक्षक सध्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर शासनाने सर्वच शाळा बंद ठेवून ऑनलाईन धडे देण्याबाबत फर्मान काढले होते. त्यानुसार प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे दिले. हे काम आजही अविरतपणे सुरू आहे. असे असतानाही वेतन देताना मात्र दिरंगाई होत असल्याचा आरोप शिक्षकांमधून केला जात आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत जिल्ह्यात सुमारे २५७ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना जानेवारी महिना सरत आला असला तरी नोव्हेंबर तसेच डिसेंबर या महिन्यांचे वेतन मिळालेले नव्हते. माध्यमिक शिक्षक संघटनेकडून शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु, कधी बजेट नसल्याने सांगण्यात आले तर कधी पोकळ आश्वासन दिले गेले. विशेष म्हणजे सरकारकडून जानेवारीमध्ये बजेट उपलब्ध झाल्यानंतर प्रशासनाने प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचे वेतन केले. परंतु, माध्यमिक शिक्षकांना वेतन मिळाले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेले शिक्षक २० जानेवारी रोजी थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांचेकडे व्यथा मांडली. वेतन वेळेवर होत नसल्याने कर्जाचे हप्ते थकले असून, इतरही आर्थिक अडचणी या शिक्षकांनी मांडल्या. चर्चेअंती दोन दिवसात वेतनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही दिली होती. संबंधित कर्मचाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या. यानंतर नोव्हेंबर महिन्याचा पगार करण्यात आला. मात्र, फेब्रुवारी महिना संपायत आला तरी डिसेंबर व जानेवारी महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही. त्यामुळे शिक्षक अडचणीत सापडले आहेत.

कोट.......

तीन महिन्यापासून शाळा चालू असून काम करुनही कामाचा मोबदला दिला जात नाही. त्यात वरुन आयकर नियोजन, घराचे हप्ते, गंभीर आजार, औषध, दवाखाना, मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, विलंबाचा दंड नाहक शिक्षकांना भरावा लागत आहे.

-प्रशांत गायकवाड, कोषाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ

सातत्याने पाठपुरावा करूनही प्राथमिक शिक्षण विभागमध्ये माध्यमिक शिक्षकांच्या पगारी बाबत उदासीनता दिसून येते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पगारी बाबतची अनिश्चितता दूर करावी अन्यथा सनदशीर मार्गाने आम्हाला आंदोलन करावे लागेल.

- महेश कांबळे, जिल्हाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ

प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला सर्व शिक्षकांचा पगार होणे अपेक्षित असताना माध्यमिक शिक्षकांना डिसेंबरपासूनचा पगार अद्याप मिळालेला नाही. यामुळे सर्व शिक्षकांचे आर्थिक हाल होत आहेत. पगार वेळेवर का होत नाहीत याचे कारण कळणे गरजेचे आहे. सीएमपी प्रणाली मुळे पगार वेळेवर होणे अपेक्षित असताना उलट विलंब होत आहे.

- पद्माकर मोरे,

मुख्याध्यापक, जिल्हा परिषद हायस्कूल, उमरगा

सातत्याने पाठपुरावा करूनही प्राथमिक शिक्षण विभाग दाद देत नाही.जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व्यथा मांडूनही न्याय मिळत नाही.माध्यमिक शिक्षकांची कुचष्ठा चालु आहे. बँकेचे होम लोनचे हप्ते वेळेवर जात नाहीत. त्यामुळे शिक्षकांचा सिव्हिल कोड खराब होत आहे.तर उदारी वेळेवर देता येत नसल्याने दुकानदारांनी उदारी बंद केली आहे. यामुळे शिक्षक वर्ग मेटाकुटीला आला आहे. अनियमित पगारीला कंटाळून जिल्ह्यातील संतप्त माध्यमिक शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात २० जानेवारी रोजी व्यथा मांडली होती.

Web Title: Financial dilemma of 257 teachers due to salary fatigue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.